आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील तुकोबांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देहूत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या छावण्या लागल्या आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी -चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या डिझायनर पगडीवर लिहिलेल्या एका अभंगावरून वाद निर्माण झाल्याने ही पगडीच बदलण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुण्यात आगमन होणार आहे. त्यांचे विमान लोहगाव विमानतळावर उतरणार आहे. यानंतर हेलिकॉप्टरने ते देहूत जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी १० पोलिस उपायुक्त, १० सहायक पोलिस आयुक्त, १०० पोलिस निरीक्षक, ३०० पोलिस उपनिरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक अशा एकूण २ हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून फक्त व्हीआयपींनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर वाहनांना काही वेळेसाठी प्रवेशबंदी असेल.
नागरिकांना सभास्थळी जाण्यासाठी लवकर निघावे लागणार आहे. त्यासाठी तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी या ३ मार्गांवरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सभास्थळी येण्यासाठी जवळपास २० बस तैैनात करण्यात आल्या आहेत. ही बस परंडवाल चौकापर्यंत जाणार असून तेथून पुढे नागरिकांना सभास्थळी पायीच जावे लागणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
डिझायनर तुकाराम पगडीवरून वाद
देहू देवस्थान संस्थानमार्फत मोदींच्या स्वाागतसाठी डिझायनर तुकाराम पगडी तयार करण्यात येत आहे. एक साधी तर दुसरी डिझायनर अशा पगड्या तयार करण्यात येत आहेत. डिझायनर पगडीवर आणि उपरण्यावर तुकोबांच्या अभंगातील ओव्या लिहिण्यात आल्या आहेत. याच ओव्यांवरून आता वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या ओळी होत्या. परंतु, यावर आक्षेप घेतला गेल्यामुळे देवस्थानाने आता या ओव्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या ओव्यांऐवजी आता पगडीवर “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ या ओव्या लिहिल्या गेल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.