कोरोना संकट : स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी पुण्यात अडकले, उपाशी राहण्याची वेळ

  • सर्व जिल्हे सील केल्याने कुणीही विद्यार्थी आपल्या गावी जाऊ शकत नाही

प्रतिनिधी

Mar 25,2020 07:48:00 AM IST

पुणे - शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात गेल्या पाच दिवसांपासून विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वास्तव्यास आलेले शेकडो विद्यार्थी अडकून पडले असून अनेकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. राज्यातील सर्व जिल्हे सील केल्याने कुणीही विद्यार्थी आपल्या गावी जाऊ शकत नाही आणि इथे त्यांना दोन वेळच्या जेवणाची समस्या निर्माण झाली आहे.


पुण्यात देश-विदेशांतून जसे अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात तसेच विविध स्पर्धा परीक्षांची आणि त्यासाठीच्या अभ्यासाची तयारी करण्यासाठीही हजारो विद्यार्थी येतात. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र येथील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) या स्पर्धा परीक्षांसाठी सर्वाधिक विद्यार्थी पुण्यात वास्तव्यास असतात. स्पर्धा परीक्षांचे कोचिंग क्लासेस, अन्य पूरक उपक्रमांची इथे सतत रेलचेल असते. सर्व विषयांतील तज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती इथे असते. त्यांना प्रत्यक्ष भेटणेही इथे शक्य होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची जणू मांदियाळीच पुण्यात असते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.


एसपीएससी स्टुडंट राइट्सचे महेश बडे म्हणाले, “पुण्यात गेल्या आठवड्यापर्यंत स्पर्धा परीक्षेचे सुमारे तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी होते. त्यापैकी बरेच विद्यार्थी गेल्या पाच दिवसांत आपापल्या गावी निघून गेले. मात्र, ज्यांना निघून जाणे शक्य झाले नाही अशांची संख्याही मोठी आहे. शहरात सुमारे पाचशे - सहाशे विद्यार्थी अजूनही अडचणीत राहत आहेत. काही सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी या विद्यार्थ्यांसाठी मदतीला तयार आहेत. पण वाहतुकीला बंदी असल्याने जेवणाचे डबेही पोहोचवता येत नाहीत. विद्यार्थी होस्टेलबाहेर पडू शकत नाहीत. सीमा बंद केल्याने गावी जाऊ शकत नाहीत. महिनाअखेर असल्याने घरी पैसेही मागू शकत नाहीत. अशा अडचणीतील विद्यार्थ्यांना विशेष परवानगी मिळावी, असे आवाहन बडे यांनी केले.


एक वेळ जेवणावरही भागवू

मूळचा अकोल्याचा (विदर्भ) विद्यार्थी देवेंद्र किल्लेदार म्हणाला, ‘मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात राहतो. होस्टेलवर सोय न झाल्याने मी अभ्यासिकेतच राहतो आणि दिवसभर तिथेच अभ्यास करतो. रविवारपासून जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. होस्टेल ओस पडली आहेत. तिथल्या मेस बंद करण्यात आल्या आहेत. हॉटेल्स बंद आहेत. फूड स्टॉल बंद आहेत. एखादी खानावळ उघडी असेल, तिथे संचारबंदीमुळे आम्ही पोहोचू शकत नाही. यंत्रणेने आम्हाला सहकार्य करावे. आम्ही एकदाच जेवू, पण तेवढे तरी मिळावे.

X