आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चिंता:पुण्यातील प्रत्येक वाॅर्ड कोरोनाग्रस्त; किमान 100 बाधित, संख्या हजारावर

जयश्री बोकील | पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसर्ग कमी असलेल्या वाॅर्डात बंधने शिथिल होताच उसळी

कोरोना संसर्गाची साखळी तुटावी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील प्रत्येक वॉर्ड कोरोनाग्रस्त झाला आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या किमान शंभरी पार करून गेली आहे. शहरातील चार वॉर्डांमध्ये तर कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराचा आकडा पार करून गेली आहे.

पुणे शहारचा विचार करता एकूण ४२ वॉर्डांमध्ये शहर विभागले आहे. यात नव्याने समाविष्ट गावांचा समावेश नाही. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या लोकसंख्येनुसार जी वॉर्डरचना आहे त्यानुसार विचार करता पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्ड कोरोना संसर्गाने ग्रस्त झाला आहे. सुरुवातीचा लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढली आहे. तो वेग दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या वॉर्डांमध्ये सुरुवातीला संसर्गाची संख्या कमी होती तिथे बंधने शिथिल होताच कोरोनाने उसळी घेतल्याचे चित्र आहे. त्यातही ताडीवाला रोड-ससून परिसर (१४६० पेक्षा अधिक रुग्ण), नवी पेठ - पर्वती वॉर्ड (१३५० हून जास्त रुग्ण), कोरेगाव पार्क - घोरपडी परिसर (१२६०) आणि येरवडा (१०३०) या वॉर्ड््सची स्थिती अधिक भयावह आहे.

उर्वरित प्रत्येक वॉर्डामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सगळ्या वॉर्डांमध्ये रुग्णांनी शंभराचा आकडा पार केला आहे. विशेषत: २५ जून ते १० जुलै या काळात रुग्णसंख्या वेगाने वाढलेली दिसत आहे. कर्वेनगर भागात २५ जूनला ४२ रुग्णसंख्या होती, ती १० जुलैपर्यंत २६५ च्या पुढे गेली आहे. बाणेर - बालेवाडी - पाषाण परिसरात ही संख्या ४६ वरून १३८ वर गेली आहे. वारजे - माळवाडी भागात ५४ वरून १८६ - १९५ अशी संख्या दिसत आहे. बावधन - कोथरूड परिसरात पहिल्या तीन महिन्यांत संसर्ग अगदी मर्यादित होता. तेथील संख्याही ५८ वरून १६० वर गेली आहे. वडगाव धायरीमध्ये हे प्रमाण ६० वरून १८५ वर पोहोचले आहे, तर एरंडवणा - हॅपी कॉलनी - डहाणूकर परिसरात ८५ वरून ३०० चा आकडा गाठला आहे. जिथे सर्वाधिक रुग्णसंख्या आहे त्या कोरेगाव पार्क - घोरपडी विभागात रुग्णसंख्या ६४६ वरून १२५५ पर्यंत, तर नवी पेठ - पर्वती भागात ९१६ वरून १३४७ वर पोहोचली आहे. लोहियानगर - कासेवाडी परिसर सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. तिथे आता वेग मंदावला असून ६५ नवे रुग्ण सापडले आहेत. खराडी - चंदननगर भागात ८९, तर विमाननगर - सोमनाथनगर भागात ९२ रुग्ण सापडले आहेत. कोरोना संसर्गाचे हे बदलते स्वरूप, आकडेवारी प्रशासनाला, आरोग्य विभागाला काहीशी गोंधळात टाकणारी ठरत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिथे सर्वाधिक प्रादुर्भाव आढळला आहे ते विभाग प्रतिबंधित करण्यात आले आहेत. मात्र, त्याबाहेरील क्षेत्रातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत ही गोष्ट प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. शहरात सध्या १०९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. वॉर्डस्तरीय विचार करताना एखादी इमारत, सोसायटी किंवा वस्ती सील करण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी तीनपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास तो भाग, सोसायटी वा वस्ती किंवा इमारत सील करण्यात येत आहे.