आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी लाट:कोरोना विषाणू अशक्त झालाय! ...पण संख्येमुळे घाबरू नका, कारण

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यापासून देशभर आणि राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी देशात बाधितांची संख्या लाखाजवळ पोहोचली आहे, तर राज्यात ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. ही वस्तुस्थिती असली तरी ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. तो प्राणघातक नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरू नका, पण कोरोना सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, असा सल्ला राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिला.

रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण नगण्य : वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण नगण्य आहे, ही दिलासादायक बाब आहे, असे सांगून डॉ. आवटे म्हणाले,‘कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने टास्क फोर्सशी चर्चा करून काही निर्णय घेतले आहेत. राज्यात होम क्वाॅरंटाइनचा कालावधी १० दिवसांवरून सात दिवस करण्यात आला आहे. मात्र, सात दिवसांनंतर संबंधित व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. सुमारे ८५ ते ९० टक्के बाधितांना कुठलीच लक्षणे नाहीत. उर्वरित बाधितांपैकी फक्त २ टक्के रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल आहेत. बूस्टर डोसची सोय शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यामुळे सामूहिक प्रतिकारशक्तीही वाढत जाईल आणि अधिकाधिक लोकांमध्ये प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) तयार होतील, अशा दृष्टीने या मुद्द्याकडे पाहता येईल, असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा सज्ज
तिसरी लाट आली तरी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. राज्यात साडेपाचशे ऑक्सिजन प्लँट तयार असून गरज पडल्यास लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. जागतिक पातळीवर संसर्गाची लाट वेगाने येते, पसरते आणि तितक्याच वेगाने कमीही होते, असे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, नियमावलीचे पालन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

९० टक्के रुग्णांना तीव्र स्वरूपाची लक्षणे नाहीत
‘कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी सुमारे ९० टक्के रुग्णांना कोणतीही तीव्र स्वरूपाची लक्षणे नाहीत. त्यामुळे होम क्वाॅरंटाइनचे प्रमाण मोठे आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ५ लाख ८५ हजार ७५८ रुग्ण होम क्वाॅरंटाइन, तर १३६८ रुग्ण संस्थात्मक क्वाॅरंटाइन आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्के आहे. मृत्युदर २.०८ टक्के आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, योग्य ती काळजी कसोशीने घ्यावी, असे डॉ. आवटे म्हणाले.

रुग्णसंख्येत वाढ, पण रुग्णालयात बेड्स रिक्त : टोपे
रुग्णसंख्येत वाढ होत असली तरीही रुग्णालयातील खाटा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही. कुठेही आपत्कालीन परिस्थिती नाही. या सर्व बाबी जमेच्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत प्रवासबंदी अथवा मुंबईतील लोकल प्रवासावर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही, अशा शब्दांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासा दिला आहे.
डॉ. प्रदीप आवटे

बातम्या आणखी आहेत...