आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायफलीची एक हजार काडतूसं सापडली:सातारा नगरपालिका इमारतीच्या खोदकामात आढळून आली गंजलेली कार्टीलेज

सातारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्हा परिषदेसमोरील कल्याणी इस्टेटमध्ये सातारा नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी सुरू असलेल्या खोदकामात रायफलीच्या 1 हजारहून अधिक काडतुसांचा साठा सापडला आहे. ही काडतुसे कोणत्या काळातील आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, त्यादृष्टीने ती पुरातत्व विभागाकडे दिली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कल्याणींनी दिली होती जागा दान

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे सहकारी अण्णासाहेब कल्याणी यांची मालकी असलेला हा संपूर्ण परिसर कल्याणी इस्टेट म्हणून ओळखला जातो. उद्योगपती बाबा कल्याणी यांनी अलीकडेच सातारा नगरपालिकेच्या इमारतीसाठी ही जागा नाममात्र मोबदल्यात दान दिली आहे

एक हजार काडतूसं

या ठिकाणी इमारतीच्या बांधकामासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू असताना आज दुपारी एकच्या सुमारास जेसीबीच्या दाताला दीड ते दोन फूट खोलीवर लोखंड लागल्याचे जाणवले. त्यामुळे हळुवारपणे वरवरची माती बाजूला केली असता गंजलेल्या अवस्थेतील बॅरलसारख्या वस्तूमध्ये रायफलीची हजारावर काडतुसे आढळून आली. त्याच्याशी संबंधित काही साहित्यही आढळले.

गंजलेल्या अवस्थेत साठा

हे सर्व साहित्य गंजलेल्या अवस्थेत आहे. हा साठा सापडताच त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी सातारा शहर पोलिस तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या साठ्याची पाहणी करून तो ताब्यात घेण्यात आला. त्याचप्रमाणे या परिसरात आणखी काही सापडते का यादृष्टीने पाहणी करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली व पोलिसांना सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...