आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:समीक्षक डाॅ. सुधीर रसाळ यांना ‘डाॅ. निर्मलकुमार फडकुले जीवनगाैरव पुरस्कार प्रदान’

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांचे वाढते प्रमाण, जागतिकीकरणामुळे बदललेली जीवनशैली आणि याचा थेट वाचन संस्कृतीवर झालेल्या परिणामामुळे महाराष्ट्रात वाङ्मयीन संस्कृतीला गौण स्थान प्राप्त होत आहे, अशी खंत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी रविवारी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, वक्ते आणि विचारवंत डाॅ. निर्मलकुमार फडकुले यांचा स्मृतिदिन समारंभ आणि त्यानिमित्त पुरस्कार प्रदान सोहळ्याचे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मराठी वाङ्मयाचे ज्येष्ठ समीक्षक डाॅ. सुधीर रसाळ यांना यंदाचा ‘डाॅ. निर्मलकुमार फडकुले जीवनगाैरव पुरस्कार’ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. रसाळ बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर तसेच अन्य पुरस्कारार्थी उपस्थित होते. डॉ. रसाळ म्हणाले की, ‘इंग्रजी भाषा रोजगारासाठी आवश्यक असली तरी त्यासाठी आपल्या मातृभाषेचा बळी देणे कदापि मान्य नाही. मराठी भाषेच्या खच्चीकरणामुळे सांस्कृतिक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. एकीकडे साक्षरता आहे मात्र दुसरीकडे वाचकांची संख्या रोडावत चालली आहे. महाराष्ट्रातील वाङ्मयीन व्यवहार कमी होत जाणे ही चिंतेची बाब आहे.’ आवारे, रोडे, पवार, रोंगटे यांचाही सन्मान जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांना ‘डाॅ. निर्मलकुमार फडकुले समाजभूषण पुरस्कार’, फेस्काॅमचे अध्यक्ष अरुण रोडे यांना ‘डाॅ. निर्मलकुमार फडकुले लोकहितवादी पुरस्कार’, तर ‘प्रतिभावंतांचे गाव’ या ग्रंथासाठी संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार यांना, ‘आदिवासींचेही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथासाठी डाॅ. तुकाराम रोंगटे यांना आणि ‘देशोधडी’ या ग्रंथासाठी डाॅ. नारायण भोसले यांना ‘डाॅ. निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यासाठी प्राचार्य बाजीराव गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...