आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखक-प्रकाशकांचे साहित्य संमेलन:मासिकांच्या योगदानाकडे समीक्षकांचे दुर्लक्ष; ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांची खंत

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या लिहिण्याच्या प्रवासात मासिकांची यंत्रणा प्रबळ होती. मासिकांमुळे मला मोठा वाचकवर्ग मिळाला आणि एक लेखिका म्हणून घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान आहे. मासिकांच्या योगदानाची मराठी समीक्षकांनी जेवढी दखल घ्यायला हवी होती, तेवढी घेतली नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

सातार्‍यातील शाहू कलामंदिर येथे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्था सातारा, आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय तिसर्‍या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात प्रकाशक संघातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार आणि जीवनगाैरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार स्वीकरल्यानंतर मंगला गोडबोले बोलत होत्या.

यावेळी प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा जीनवगाैरव पुरस्कार नाशिक येथील वसंत खैरनार यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती आणि सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक वितरण देखील यावेळी झाले. संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर आणि विनय हर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले, तिसर्‍या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस, विनय हर्डीकर, मगंला खैरनार, वसंत खैरनार, मंगला गोडबोले, या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ लेखिका आणि पुरस्कार निवड समितीच्या सदस्या डॉ. अश्विनी धोंगडे आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुस्तकाची अंतिम समीक्षा काळच करतो

गोडबोले म्हणाल्या की, जीव तोडून आणि मनापासून लिहिले की, गंभीर लेखन असले तरी वाचकांकडून त्या लेखनाचे स्वागत होते. विनोदी लेखन करणाऱ्यांचे गंभीर लेखन वाचले जात नाही, असा अनुभव माझ्या बाबतीत आलेला नाही. केवळ विनोदी लेखनच विकले जाते, हा गैरसमज आहे. माझ्या मते, जगात सर्वात अधिक चांगला समीक्षक हा 'काळ' असतो. जे चांगले असते ते काळाच्या पटलावर टिकते, जे निरूपयोगी असते, ते मागे पडते. प्रत्येक पुस्तकाची अंतिम समीक्षा काळच करीत असतो. लेखकाच्या प्रतिभेचे मोल प्रकाशक आणि वाचक ओळखतात आणि त्या प्रकारच्या लेखकाला ते जोपासतात.

वसंत खैरनार म्हणाले की, मी वाचन संस्कृतीच्या पालखीचा एक वारकरी आहे. आम्ही नाशिकमध्ये राबवित असलेल्या साहित्यिक उपक्रमांमुळे मला हा पुरस्कार मिळाल्याची मला जाणीव आहे.

विनय हर्डीकर म्हणाले की, वाचन संस्कृती जोपासणारा वाचक हा लेखक-प्रकाशक यंत्रणेतला कणा आहे. त्यामुळे सुजाण वाचक पुरस्कार देखील दिला गेला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...