आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या अभ्यासक्रमानुसार 2023 मध्ये सीएसची परीक्षा:कंपनी सेक्रेटरीच्या नवीन अभ्यासक्रमाला सप्टेंबरपर्यंत अंतिम स्वरूप; आयसीएसआयची घोषणा

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनी सेक्रेटरीचा (सीएस) अभ्यासक्रम लवकरच बदलण्यात येणार असून, नवीन अभ्यसक्रमात कौशल्य विकासावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यासाठीचा मसुदा पुढील महिन्यात जाहीर करून सप्टेंबरपर्यंत त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे.काही दिवसांपूर्वीच सीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे जाहीर केल्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाकडून (आयसीएसआय) यांनी सीएसच्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

‘आयसीएसआय’चे अध्यक्ष देवेंद्र देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत नव्या बदलांची माहिती शुक्रवारी दिली. यावेळी उपाध्यक्ष मनीष गुप्ता, आशिष मोहन, संजय पटारे आदी उपस्थित होते. नवीन शिक्षण धोरणानुसार ‘सीएस’च्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. साधारपणे दर पाच वर्षांनी अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन त्यात बदल केला जातो. त्यानुसार पुढील महिन्यात नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा जाहीर केला जाईल. त्यावर सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये अभ्यासक्रमाला अंतिम रूप दिले जाईल. नवीन अभ्यासक्रमासलाठी अभ्यास साहित्याची निर्मिती करण्याचे काम देखील सुरू आहे. या अभ्यासक्रमानुसार डिसेंबर 2023 मध्ये पहिली परीक्षा घेतली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

कॉर्पोरेट कायदा, कंपनी कायदा, जीएसटी कायदा, कामगार कायदा, शेअर बाजाराशी संबंधित कायदे आदी कायद्यात गेल्या काही वर्षात झालेले बदल. तसेच, बँक दिवाळखोरी आणि दिवाळखोर कायदा 2016 यानुसार ‘सीएस’च्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे, असे ‘आयसीएसआय’च्या पुणे विभागाचे अध्यक्ष संजय पटारे यांनी सांगितले.

सीएस बनणार प्राध्यापक; यूजीसीला प्रस्ताव

कंपनी सेक्रेटरी यांना ‘प्रॅक्टिसिंग प्रोफेसर’ची मान्यता देऊन कॉलेजांमध्ये अध्यापनाची संधी देण्याबाबतचा प्रस्ताव इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पाठविला आहे. त्यावर ‘यूजीसी’ने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या काळात त्यावर निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती देवेंद्र देशपांडे यांनी दिली.

स्टार्ट-अप सारथी प्रोजेक्ट

‘आयसीएसआय’कडून देशपातळीवर ‘स्टार्ट-अप सारथी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये सर्व ‘सीएस’ची माहिती एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातून ‘स्टार्ट-अप’ना चांगले ‘सीएस’ मिळतील आणि त्यांना चांगली सेवाही मिळेल, अशी अपेक्षा देवेंद्र देशपांडे यांनी व्यक्त केली.

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

‘आयसीएसआय’टी प्रॅक्टिसिंग कंपनी सचिवांच्या 23व्या राष्ट्रीय परिषदेचे 18 आणि 19 जूनला लोणावळ्यात होणार आहे. ‘कंपनी सेक्रेटरी- अ प्रिफर्ड प्रोफेशनल’ हा या परिषदेचा मुख्य विषय आहे. या परिषदेला केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रिजिजू उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...