आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:​​​​​​​बिटकॉइन गुन्ह्यातील सायबरतज्ज्ञ आरोपींवरील एमपीआयडी कलम रद्द, सत्र न्यायालयाकडून प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिटकॉइन गुन्ह्याच्या तपासात पुणे सायबर पोलिसांना सायबरतज्ज्ञ म्हणून मदत करणाऱ्या पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी गाेपनीयतेचा भंग करून गैरमार्गाने आरोपींच्या खात्यातील बिटकॉइन त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचे उघडकीस आल्याने त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सदर दोघांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध कायदा (एमपीआयडी) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यास बचाव पक्षाचे वकील रोहन नहार अाणि अॅड. अमाेल डांगे यांनी आक्षेप घेत न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गाेसावी यांच्या न्यायालयाने आरोपींवरील एमपीआयडी कायदा रद्द ठरवत सदर प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहे. दरम्यान, आरोपींना २५ मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

पंकज घोडे व रवींद्र पाटील यांना १२ मार्च रोजी सायबर पोलिसांनी अटक केली होती. त्यांची शनिवारी पोलिस कोठडीची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, त्यांचे वकील रोहन नहार यांनी आरोपींवर पोलिसांनी लावलेल्या एमपीआयडी कायद्याला विरोध करत युक्तिवाद केला की, कोणत्याही ठेवीदारांचे पैसे आरोपींनी घेतल्याचा प्रकार घडलेला नसून तशा प्रकारचा कोणताही अर्ज पोलिस अथवा न्यायालयाकडे आलेला नाही. त्यामुळे आरोपींचा एमपीआयडी कायदा रद्द करून हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात वर्ग करावे.

सरकारी वकील मिलिंद वाडेकर यांनी प्रतिवाद करताना सांगितले की, आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलिस महासंचालकांच्या सूचनेनुसार सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला आहे. यात आरोपींनी माेठ्या प्रमाणात बिटकॉइन गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बिटकॉइनच्या माहितीसाठी तज्ज्ञांची मदत घेतली होती. मात्र, आरोपींनी परस्पर बिटकॉइन त्यांच्या खात्यात वर्ग केले आहे.

बिटकॉइनची चोरी पोलिसांनीच केली
अमाेल डांगे युक्तिवादादरम्यान म्हणाले, पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास झाला असून केवळ तज्ज्ञ म्हणून पक्षकाराने काम केले आहे. पोलिसांसमाेर बिटकॉइन आरोपींच्या खात्यातून पोलिसांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून त्याबाबतचे स्क्रीन शाॅट त्या त्या वेळी काढून देण्यात अाल्याने त्यात खाडाखोड करण्याचा प्रश्न नाही. बिटकॉइनची चाेरी पोलिसांनीच केली असून यासंदर्भात त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे.

क्रिप्टो वेगवेगळ्या मार्गाने परदेशात वळवले
आरोपी पंकज घोडे याच्या ब्लाॅकचेन वेबसाइटची पाहणी करता पोलिस वाॅलेटवर वळवलेली क्रिप्टाे करन्सीव्यतिरिक्त इतरही काही संशयित वाॅलेटवर रक्कम वळवलेली आहे. अटकेतील आरोपींनी गुन्ह्यातील आरोपींच्या क्रिप्टाेकरन्सी वाॅलेटवर नियंत्रण मिळवून त्याद्वारे गैरव्यवहार केला आहे. क्रिप्टाेकरन्सी वेगवेगळ्या मार्गाने विदेशात पाठवून तेथून विविध मार्गाने ती मालमत्ता भारतात आणली आहे. रवींद्र पाटील याच्या विविध क्रिप्टाेकरन्सी वाॅलेटमधून १ कोटी १० लाखांचे क्रिप्टाेकरन्सी जप्त करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...