आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा पुढाकार:रुग्णांना ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीद्वारे दगडूशेठ बाप्पाचे दर्शन; दर्शनावेळी रुग्णांना आनंदाश्रू अनावर

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयू मधील रुग्णांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे 130 व्या वर्षी गणेशोत्सवात निमित्त ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी स्टार्टअप - डिजिटल आर्ट व्हीआरई या माध्यामातून बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. तसेच या वेळी बाप्पाच्या दर्शनावेळी रुग्णांना आनंदाश्रू अनावर झाले.

गणरायाचा होतो भास

विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयाच्या खाटेवर उपचार घेत असलेले रुग्ण परमेश्वराकडे आपण लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतात. ऐन गणेशोत्सवात आपण गणरायासमोर जाऊन नतमस्तक व्हावे, ही इच्छा सामान्यांप्रमाणे या रुग्णांची देखील असते. मात्र, आजारपणामुळे त्यांना रुग्णालयातील खाटेवरुन कोठेही जाता येत नाही. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन त्यांना रुग्णालयात, ते आहेत, त्या विभागमध्ये, त्यांच्या खाटेवर बसून देण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे ते रुग्ण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहेत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे.

500 रुग्णांना दर्शन घडवण्याचा मानस

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, पुणे शहरातील 15 रुग्णालयांमधील अंदाजे 500 रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा ट्रस्टचा मानस आहे. याबाबत संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांच्या विशेष परवानग्या घेतल्या आहेत, ज्यांनी आम्हाला उत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये हा अनुभव देण्यास अनुमती दिली आहे. यामुळे रुग्णांना वेगळी उर्जा व समाधान मिळणार असून बाप्पाचा हा दर्शनरुपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कोविडमुळे निर्माण झालेले भय व नैराश्य दूर होऊन यामाध्यमातून रुग्णांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

रुग्णांनी व्यक्त केल्या भावना

ससून रुग्णालयात उपचार घेणारे पनवेल येथील 87 वर्षांचे रुग्ण प्रभाकर डिंगोरकर म्हणाले, उद्याची चिंता, नकारात्मकता आमच्यासारख्या रुग्णांमध्ये नेहमी असते. मात्र, आज विघ्नहर्ता गणरायाचे दर्शन झाले. जेव्हा मला भगवंताचे दर्शन झाले आणि आरती, सजावट पहायला मिळाली, त्यावेळी नकळत अशी उर्जा आली, ज्यामुळे मी लवकर बरा होईन आणि मला लवकर घरी जाता येईल.

रुग्णांना बसल्याजागी बाप्पाचे दर्शन

डिजिटल आर्ट व्हीआरई चे संस्थापक संचालक अजय पारगे म्हणाले, गणपती बाप्पा मेटाव्हर्समध्ये असतील आणि आरोग्याच्या स्थितीनुसार काही रुग्ण आभासी माध्यमाद्वारे बाप्पासमोर उभे राहून आरती करू शकतील. हे रुग्ण इतर भक्तांच्या शेजारी उभे राहून जप करताना आणि अभिषेक करतानाही पाहतील. त्यामुळे त्यांना बसल्याजागी बाप्पासाठी केलेली सजावट व प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा अनुभव मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...