आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन सिमेवर जवानांकडून दगडूशेठचे पूजन:अरुणाचल प्रदेशमधील मराठा बटालियनला ट्रस्टकडून 2 फुटी मुर्ती भेट

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा मोरया... जय गणेश... असा जयघोष थेट अरुणाचल प्रदेशमधील चीन सिमेवर असलेल्या भारतीय लष्कराच्या ठाण्यावर झाला. भारतीय लष्करातील 1 मराठा बटालियनच्या सैनिकांनी सिमेवर गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीच्या श्रीं च्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आगमन मिरवणूक काढली. दहीहंडीच्या दिवशी 19 ऑगस्ट 2022 रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ही श्रीं ची हुबेहुब 2 फुटी प्रतिकात्मक मूर्ती सैनिकांना देण्यात आली होती.

भारतीय लष्करातील एक मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा मागील वर्षी देखील सैनिकांच्यावतीने व्यक्त केली होती. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. त्यानुसार ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब 2 फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य करीत बटालियनला मागील वर्षी व यावर्षी देखील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये मूर्ती सुपूर्द केली. लष्करातील 1 मराठा बटालियनचे बालाजी कदम यांनी याकरिता समन्वयाचे काम केले.

गणेश चतुर्थीच्या दिवशी मंगलमूर्ती मोरयचा गजर करीत सैनिकांनी सिमेवरील लष्कराच्या ठाण्यात हुबेहुब दगडूशेठ गणपतीच्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे यंदा देखील पारंपरिक पद्धतीने थेट चीन सिमेवरील लष्करी ठाण्यात ही आगमन मिरवणूक काढण्यात आली. केळीचे खुंट वापरुन साकारलेल्या रथात दगडूशेठ च्या श्रीं ची हुबेहुब मूर्ती विराजमान झाली होती.

भारतीय लष्कराच्या गणवेशात सर्व सैनिक मोठया उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच झांज वाजवित पारंपरिक खेळ देखील सैनिकांनी सादर केले. सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येतच असे नाही. अरुणाचल प्रदेशमधील सिमेवर देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे दगडूशेठ गणपती बाप्पाचा आशीर्वाद तेथे देखील उत्सवाच्या यामाध्यमातून सर्व सैनिकांना मिळेल, अशी धारणा येथील सैनिकांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...