आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
भाविकांची दर्शनासाठी गर्दी
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, द्राक्षाच्या हंगामात सलग दुस-या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष शेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतक-यांना येत आहेत. मात्र या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतक-यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतक-यांच्या वतीने साकडे घालण्यात आले.
आयुर्वेदात द्राक्षांचे महत्व
सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.