आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडेटिंगच्या नावाखाली पुण्यातील एका 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास एक कोटी दोन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजत सिन्हा, नेहा शर्मा, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
डेटिंग सेवेच्या नावाखाली कॉल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2022 पासून हा प्रकार सुरू होता. ज्येष्ठ नागरिक असलेले तक्रारदार हे उच्चभ्रु घरातील आहेत. त्यांना मे २०२२ मध्ये नेहा शर्मा नावाच्या तरुणीने फोन केला होता. आपण के. बी. टेलीकाॅम या डेटिंग कंपनीतून बोलत असून डेटिंग सर्व्हिस देत असल्याची माहिती तरुणीने दिली. डेटिंग सेवा घेण्याकरिता सुरुवातीला काही पैसे कंपनीत भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे देत रिफंडबेल चार्जेस असल्याचे सांगुन ज्येष्ठ नागरिकाला वेगवेगळ्या खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात आले होते.
बदनामीची धमकी दिली
त्यानुसार तक्रारदार आरोपींच्या विविध खात्यात पैसे भरत गेले. परंतु त्यानंतर आरोपींनी त्यांना दगा देऊन, तुम्ही बेकायदेशीरपणे डेटिंग सर्व्हीस घेण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात तुमची बदनामी करु, तुमच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करु, अशी धमकी देऊन वर्षभर पुन्हा त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. त्यानुसार तक्रारदाराने आतापर्यंत एक कोटी दोन लाख रुपये आरोपींच्या खात्यावर भरले.
अखेर पोलिसांकडे धाव
अखेर सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आणि संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पुढील तपास पुणे सायबर पोलिस करत आहेत. नागरिकांनी अशाप्रकारे डेटिंग सर्व्हिसला बळी पडू नये आणि फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.