आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी पद्धत बंद करा:राष्ट्रीय श्रमिक आघाडीची मागणी, नवीन कामगार कायद्यांविरोधात बेमुदत उपोषण

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामगार हिताच्या विरोधातील कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, कंत्राटी पद्धत बंद करावी, कायम कामगारांच्या संघटनेचे अधिकार अबाधित रहावे, 240 दिवस होताच कामगार कायम करावे, या मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे प्राणांतिक उपोषण केले जाणार असल्याची माहिती आज आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदते दिली. 10 ऑगस्टपासून आपण उपोषणाला बसणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

कामगारांची पिळवणूक

भोसले म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये कामगार व श्रमिकांची दैन्यवस्था झालेली आहे. कंत्राटी कामगार अधिनियम १९७०चा गैरवापर करून कायमस्वरूपी कामगारांच्या जागेवर सर्वच उद्योगातील आस्थापनांमध्ये कंत्राटी पद्धतीवर तरुणांना कामावर ठेवून त्यांचे शोषण चालू आहे. कामगारविरोधी कायद्यांचा कायम कामगार व कामगार संघटना यांच्यावर खुप मोठा परिणाम झाला आहे. कायम कामगारांवर सूडबुद्धीने खोटे आरोप लावून बडतर्फ करणे, संघटना प्रतिनिधींवर कारवाई करणे, कायम कामगारांची इतर राज्यांमध्ये बदली करणे, कामगारांची पिळवणूक करणे, सुविधा न देणे व वेळेवर वेतनवाढीचे करार न करणे, कायम कामगार काढून त्यांच्या जागी कंत्राटी कामगार लावणे, हे सर्रास सर्वच कारखान्यांमध्ये व आस्थापनांमध्ये चालू आहे. एनईईएमएस व कंत्राटी पद्धतीमुळे येणाऱ्या पिढीचे व सध्याच्या कामगारांचे शोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या हिताचे कामगार कायदे अस्तित्वात येणे व आत्ताच्या कायद्यांना संरक्षण देण्यासाठी आवाज उठवणे ही काळाची गरज आहे.

कोरोना काळात अधिक फटका

यशवंत भोसले यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये शासनाचे व जिल्हाधिकारी तसेच श्रम मंत्रालयाचे आदेश होते की, कोणत्याही उद्योगातील कामगारांना काढू नये व त्यांचे वेतन कपात करू नये. असे असताना अनेक उद्योजकांनी कायम कामगारांना काढले आणि कामगारांचेवेतन देखील कपात केले. या मागण्यांचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आल्याचे यशवंत भोसले यांनी सांगितले.

या आहेत मागण्या

कामगारांच्या हिताच्या विरोधातील कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, कंत्राटी पद्धत बंद करावी, कायम कामगारांच्या संघटनेचे अधिकार अबाधित रहावे, २४० दिवस होताच कामगार परमनंट व्हावेत, संबंधित कंपनीतील कामगारांना कामावर हजर करून घ्यावे याकरिता यशवंत भोसले हे कामगारांच्या उपस्थितीत दि. 10 ऑगस्ट रोजी पासून कामगार आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे उपोषणास बसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...