आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाकड परिसरातील एका हॉटेलमध्ये नाचताना वादविवाद झाल्यानंतर हॉटेलच्या बाऊन्सर, मॅनेजरकडून मारहाण होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी एका तृतीयपंथीने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्याचा दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात द बार हिस्ट या हॉटेलचे मॅनेजर, बाऊन्सर यांचेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अभय मनोज गोंडाणे (वय-21, रा.येरवडा, पुणे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. याबाबत एका 24 वर्षीय तृतीयपंथीने वाकड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी द बार हिस्ट हॉटेलचे मॅनेजर गजानन खरात, यांच्यासह बाऊन्सरवर गुन्हा दाखल केला आहे. 25 जुलै रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेला तक्रारदार हा तृतीयपंथी असून त्याचा मित्र अभय हा विमाननगर परिसरात एका खासगी कंपनीत कस्टमर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. मीस्ट ऑर्गनायझेशन या कंपनीकडून एलजीबीटी लोकांसाठी 25 जुलै रोजी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
तृतीयपंथी साेबत भांडणे
अभय व तक्रारदार इसम हे दोघे वाकड येथील द बार हिस्ट या हॉटेल मध्ये गेले हाेते. सदर पार्टीत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ते गाण्याच्या तालावर नाचत असताना, दुसऱ्या एका तृतीयपंथी साेबत त्यांची भांडणे झाली. यावेळी हॉटेलचे मालक व त्यांची पत्नी तसेच मॅनेजर गजानन खरात, बाऊन्सर यांनी त्यांना हॉटेल मधून बळजबरीने बाहेर काढले. त्याचा राग आल्याने अभय हा पुन्हा हॉटेलमध्ये आत गेला. त्यावेळी त्याठिकाणी असलेला बाऊंन्सर, बार टेंडर, डी.जे व मॅनेजर यांनी सदर दाेघांच्या डोक्यात खुर्च्या मारल्या व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी घाबरुन अभय हा पळत हॉटेलच्या बाहेर गेला.
दुसऱ्या मजल्यावरुन उडी
त्याच्यामागे हॉटेलचा मॅनेजर गजानन खरात हा गेल्याने त्याच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी अभय हॉटेलच्या लॉबीत गेला व तेथून पळून जाण्यासाठी दुसरी जागा नसल्याने त्याने मरण्याच्या भितीने दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. त्यावेळी अभय याचे डोक्याला इजा हाेऊन ताे रक्ताच्या थाराेळयात पडला. त्याला तातडीने आदित्य बिर्ला रुग्णालयात नेले असता त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्यास ससून रुग्णालयात हलवले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत पुढील तपास वाकड पोलिस करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.