आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची लाडकी दख्खनची राणी धावली:डेक्कन क्वीन आजपासून नव्या रूपात, नव्या रंगसंगतीसह 16 नवे​​​​​​​ एलएचबी डबे

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

92 वर्षांची आणि प्रवाश्यांची लाडकी दख्खनची राणी (डेक्कन क्वीन) नव्या रूपात सेवेसाठी दाखल झाली आहे. पुणे ते मुंबई असा दख्खनच्या राणीचा नव्या रूपातला पहिला प्रवास गुरुवारी झाला. डेक्कन क्वीनला 16 नवे एलएचबी अपघातरोधक डबे जोडण्यात आले आहेत. आकर्षक रंगसंगतीमुळे ही गाडी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रस्थान बनली आहे. सोबतच नव्या रचनेची डायनिंग कारही या गाडीला जोडण्यात आली आहे.

पहिला प्रवास मुंबई-पुणे

बुधवारी रात्री डेक्कन क्वीनने मुंबईतून पुण्याचा प्रवास केला. गुरुवारी सकाळी नव्या देखण्या रूपातील डेक्कन क्वीनने पुण्यातून सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी प्रवासाला सुरवात केली आणि दहा वाजता ही गाडी मुंबईला पोहचली. ही तिची नव्या रूपातली पहिली धाव होती. डेक्कन क्वीन ही सुरवातीपासूनच प्रवाश्यांची लाडकी रेल्वे आहे. नुकताच 1 जून रोजी या गाडीचा 92वा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला.

निसर्गसौंदर्याचे घेता येणार दर्शन

पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणारी ही पहिली डिलक्स रेल्वे आहे. गुणवत्तेचे मानांकनही या गाडीने मिळवले आहे. डेक्कन क्वीनच्या प्रवासासोबत तिच्या डायनिंग कारमध्ये मिळणारे खाद्यापदार्थही प्रवाशांचे लाडके आहेत. काही महिन्यांपूर्वी या गाडीला व्हिस्टाडोम श्रेणीचा डबाही जोडण्यात आला आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा-कामशेत परिसरातील निसर्गसौंदर्याचे दर्शन घेत प्रवास करणे शक्य झाले आहे.

मुंबई ते पुणे दरम्यान मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग प्रवास करतो. त्यांची डेक्कन क्वीनलाच अधिक पसंती असते. ही गाडी 1 जुन 1930 रोजी पहिल्यांदा धावली. त्यापूर्वी ही गाडी कल्याण ते पुणे धावत होती. त्यानंतर सीएसएमटीपर्यंत धावायला लागली. यात महिलांसाठी राखीव डबे, पासधारकांसाठी डबे, जनरल डबे, वातानुकूलित डब्यांबरोबरच डायनिंग कारही आहे. अशा डेक्कन क्वीनला नव्या रुपात आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

डेक्कन क्वीन नव्या रूपात

डेक्कन क्वीनला वेगळी रंगसंगती देण्यात आली असून त्यातील आसनव्यवस्थेतही बदल केले आहेत. अंतर्गंत सजावटीतही बदल करण्यात आले आहेत. नव्या डेक्कन क्वीनचे डबे हे एलएचबी असून वजनाने हलके पण मजबूत आहेत. जुन्या डब्यांच्या तुलनेत या डब्यात अधिक जागा असून प्रवाशांना सहजपणे वावरता येईल. याशिवाय डायनिंग (उपहारगृह डबा) कारमध्ये बदल करण्यात आले असून तो डबा रुंद आहे आणि त्यात अग्निशमन यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डब्यात एकाच वेळी 40 प्रवासी बसून खानपान सेवेचा आस्वाद घेऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...