आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'सत्य, लोकशाही, प्रेम,समता,बंधुता ही श्वाश्वत मुल्ये आहेत, चिरंतन मुल्ये आहेत. संघ, सावरकरवादी आणि रा. स्व. संघाला द्वेष वाढवून ही शाश्वत मूल्ये नष्ट करायची आहेत. द्वेषाचे हे राजकारण फेकून द्यायचे असेल तर गांधींजींप्रमाणे चिरंतन, शाश्वत मुल्यांचा आक्रमक प्रसार करावा लागेल ', असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी रविवारी केले.
कर्नाटकमधील युवापिढीने द्वेषाचे राजकारण फेकून दिले. पुढील पिढी लोकशाहीमधेच नांदावी, असे वाटत असेल तर आपण या पिढीत प्रबोधनाचा आग्रह धरला पाहिजे. संघटन, विचार प्रसाराची यंत्रणा तयार करावी लागणार आहे. सत्तेविरुद्ध सत्याचा विजय होणारच आहे असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ' गांधी दर्शन शिबिर ' या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गांधी भवन येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, प्रा. श्रीरंजन आवटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी,अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, संदीप बर्वे,सुदर्शन चखाले ,सचिन पांडुळे , अस्लम बागवान ,अप्पा अनारसे,प्रसाद झावरे-पाटील उपस्थित होते.
निरंजन टकले म्हणाले, गांधीजींनी चरख्याद्वारे सर्वसामान्य माणसाला कार्यप्रवण केले, आश्वस्त केले आणि इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात अहिंसात्मक साधन दिले. महात्मा गांधींनी मध्ययुगीन उदाहरणे सांगितली नाही,त्यांनी वर्तमानातील प्रश्नांना वर्तमानकालीन उत्तरे दिली.कोणत्याही खोट्या प्रचाराबाबत मनात प्रश्न आले पाहिजेत.विश्लेषण करता आले पाहिजे. तरच बुध्दीभेद करणाऱ्या प्रचार साहित्याचे प्रयत्न हाणून पाडता येतील.'चले जाव ' सारख्या शब्दांना गांधीजींनी मंत्राचे सामर्थ्य दिले. कारण त्यांना नैतिक अधिष्ठान होते.
रा. स्व. संघाकडून गांधींबद्दलचा अपप्रचार - डॉ.कुमार सप्तर्षी
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, संघाला पुराणकालीन व्यवस्था आणायची आहे. यज्ञ संस्कृतीचा ब्राह्मण वर्चस्ववाद आणायचा आहे. व्यक्तीचा मानसिक दृष्टया ताबा घेऊन ते प्रसार करतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको आहेत . संघाने अपप्रचार करून गांधीजींची चुकीची प्रतिमा पसरवली आहे. खरे गांधी विचारांनी अजून जिवंत आहेत. खरा गांधी झाकोळून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसही गांधी विचार पुढे नेण्यात अपयशी ठरली.गांधी हे शास्त्र आहे. सार्वजनिक जीवनात ते उपयुक्त आहे, ज्यांनी सत्याग्रहाची कास धरली, त्यांना अपयश येत नाही. सत्याला सामर्थ्याची जोड दिली तरच विजय होतो . लोक उभे राहिले की द्वेषवादी वृतीचा पराभव होतो, हे कर्नाटकात दिसले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.