आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे शहराला वर्षाला हवे 20 टीएमसी पाणी:महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची नगरविकास विभागाकडे पत्राद्वारे मागणी

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या शहरीकरणामुळे पुण्यात पाणी व्यवस्थापणावर ताण येत असून पाण्यासाठी शहरी आणि ग्रामीण असा संघर्ष निर्माण होत असून शहराची सध्याची पाण्याची गरज पाहता शहराला वर्षभरासाठी 20 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नगरविकास विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

यामुळे व्यवस्थापनावर ताण

पिण्यासाठी, शेतीसाठी, औद्योगिक वापर, शहरातील रहिवासी इमारतीची बांधकामे, पायाभूत सुविधांची बांधकामे, पर्यावरण संरक्षण, नदी स्वच्छता, सांडपाणी शुद्धीकरण व्यवस्थेमधील वाढ यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगांव व टेमघर या धरणांच्या जलव्यवस्थापनावर ताण वाढत आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी 1997 चे जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या करारनाम्यानुसार सन 2001 पर्यंत पुणे शहरासाठी 11.5 टीएमसी पाणीकोटा मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी शहराची लोकसंख्या 31.15 लक्ष होती. मात्र, आता ही लोकसंख्या जवळपास दुपटीच्यावर गेली आहे. त्यातच महापालिकेची हद्दही गेल्या पाच वर्षांत दोनदा वाढली असून, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महापालिका राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनली आहे. अशा स्थितीत दरदिवशी 1,605 एमएलडी पाण्याची मागणी असून त्यासाठी वार्षिक वापर 20.40 टीएमसी होतो.

मात्र, प्रत्यक्षात महापालिकेस शासनाकडून मंजूर कोटा कमी असल्याने मार्च ते जुलै या कालावधीत शहरासाठी पिण्याचे पाणी कमी पडते. तर पालिकेने जादा पाणी घेतल्यास जिल्ह्यातील सिंचन योजनांचे पाणी कमी होते. त्यामुळे ग्रामीण व शहरी वाद होतात. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी वापराबाबत खात्री करून पाण्याचा कोटा वाढवावा, अशी मागणी आयुक्तांच्या पत्रात करण्यात आली आहे.

पश्‍चिम खोरे तसेच मुळशीचे पाणी द्यावे

पुणे शहराला जादा पाणी मिळण्याबाबत महापालिकेने जलअभ्यासक तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. यावेळी या अधिकाऱ्यांनी भीमा उपखोऱ्यातून कोकणाकडे नाल्यांद्वारे जाणारे पाणी पश्‍चिम खोऱ्यात वळविल्यास 2 ते 3 टीएमसी पाणी वाढेल तसेच टाटा पॉवर कंपनी मागील 100 वर्षापासून भीमा खोऱ्यातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरत असून वीजेच्या निर्मितीनंतर हे पाणी कोकण प्रदेशांत वापरले जाते. कोकण खोरे हे विपुल जलसंपत्तीचे खोरे आहे. मात्र उर्ध्व भीमा खोरे हे तुटीचे खोरे असल्याने व पुणे शहराची वाढती लोकसंख्या शहराकडे होणारे स्थलांतर व व्यापक पायाभूत सुविधांची व रहिवाशी इमारतींची बांधकामे यांची गरज लक्षात घेता पश्‍चिमेकडून 8-10 टीएमसी पाणी पूर्वेकडे वळवून पावसाळ्यानंतर खडकवासला प्रणालीमध्ये उपलब्ध करुन दिल्यास पुणे शहरासाठी उपयोगी आणता येईल, अशी उपाय योजना महापालिकेने शासनास सुचविली आहे.