आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्राद्वारे हडपली जमीन:पिस्तूलाचा धाक दाखवत 60 लाखांची मागणी; न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी खंडणी

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीचा विकसन करारनामा करायचा आहे असे सांगून, कोऱ्या कागदावर फोटो लावून, स्वाक्षऱ्या तसेच अंगठे घेऊन परस्पर जमिनीचे खरेदीखत केले. त्यानंतर न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी पिस्तूलाचा धाक दाखवत 60 लाखांची खंडणी मागितली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार 3 जानेवारी 2018 ते 10 जुलै 2022 या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी आणि माण स्मशानभुमी जवळ घडला.

वसंत धोंडिबा साळुंखे (50, रा. माणगाव, ता. मुळशी,पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष अंकुश मोहिते, किशोर अंकुश मोहिते, अंकुश किसन मोहिते, एक चालक, दोन बॉडीगार्ड आणि गाडीतील अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत साळुंखे आणि त्यांचा भाऊ अरूण यांची माणगाव येथे 75 गुंठे जमीन आहे. या जमीनीचा विकसन करारनामा करायचा आहे, असे आरोप संतोष मोहिते, किशोर मोहिते यांनी सांगितले. त्यासाठी 3 जानेवारी 2018 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात कुलमुखत्यार करुन घेतले. याला जोडण्यासाठी कागदपत्रे लागत आहेत, असे सांगून कोऱ्या कागदावर दोघा साळुंखे भावांचे फोटो लावून, स्वाक्षऱ्या आणि अंगठे घेतले. त्याआधारे 75 गुंठे क्षेत्रातील 20 गुंठे जमीन परस्पर स्वतःचे नावे करुन, कोणताही मोबदला न देता साळुंखे यांची फसवणूक केली.

दरम्यान 10 जुलै 2022 रोजी गावातील रामदास मोहिते यांची मयत झाल्याने अत्यंविधी करून साळुंखे हे रात्री घरी येत होते. त्यावेळी संतोष मोहिते व त्याच्या इतर साथीदारांनी साळुंखे यांना अडवून दिवाणी न्यायालयात असलेला दावा मागे घेण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत बसण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला.

त्यावेळी साळुंखे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन जाळून टाकण्याची धमकी दिली. तसेच मोहितेच्या बॉडीगार्डने साळुंखे यांच्या डोक्याला पिस्तुल लावून गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेले. त्याठिकाणी शिवीगाळ करुन 'तुझ्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यामुळे तू मला 60 लाख रुपये दे' अशी खंडणी मागितली. तसेच पैसे नाही दिले तर तुला ठार मारुन टाकेन, अशी धमकी दिली. हिंजवडी पोलिस याबाबत पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...