आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधनाच्या वाटा शोधण्याची गरज:विश्वास पाटलांचे मत; 'अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान' कादंबरीला पुरस्कार

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ मराठी लेखकांकडूनच नाही तर राजकारणी, मराठी समीक्षक, पुरोगामी अशा सर्वांकडून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याकडे दुर्लक्ष झाले. पुढील काळात त्यांच्या विपुल साहित्याचा गुणत्मत दृष्टीने विचार व्हावा आणि संशोधनाच्या वाटा शोधल्या जाव्यात, असे मत ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासानातर्फे 'अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान' या ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीला 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत सासणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी विश्वास पाटील बोलत होते. यावेळी लोकशाहीरांच्या फकिरा कादंबरीच्या एकूण 52 व्या आवृत्तीचे प्रकाशक गुलाबराव कारले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे, मराठी विषयाच्या प्राध्यापिका डॉ.श्यामा घोणसे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी विश्वास पाटील म्हणाले, अण्णाभाऊंच्या साहित्याला महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्य म्हणून गणले जाते, मात्र प्रत्यक्ष त्यांच्या लिखाणाचा अभ्यास केल्यास त्यांचे साहित्य हे भारतीय साहित्य, महानगरीय साहित्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान मोठे असले तरी त्यांचे स्थान मात्र आज जयंतीला हार घालण्यापुरते मर्यादित ठेवले आहे. मात्र आता तरी त्यांच्या समग्र वाड:मयावर अभ्यास करणे गरजेचे आहे.

सासणे म्हणाले, समीक्षेतील साचलेपण दूर करण्याचं काम पाटील यांच्या अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान या कादंबरीने केले आहे. अण्णाभाऊंचे सामर्थ्य नव्या लेखकांनी आता समाजासमोर आणावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भंडगे यांनी केले तर पुरस्कारविजेत्या कादंबरीविषयी डॉ.श्यामा घोणसे यांनी सांगितले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत साठे यांनी केले तर आभार डॉ.विजयकुमार रोडे यांनी मानले.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे दालन उभारू

आण्णाभाऊंचे साहित्य हे रोजच्या जगण्याशी निगडित होते. त्यांचे साहित्य दुर्लक्षित राहिल्याची खंत आहेच पण ही कमतरता विद्यापीठ स्तरावर आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू. अण्णाभाऊंचे साहित्याचं दालन तसेच त्यांच्या साहित्याची व्हर्चुवल गॅलरी आम्ही उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी डॉ.संजीव सोनवणे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...