आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी सोहळा:दोन वर्षांनंतर माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान; लाखो वारकरी सहभागी

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ ही उक्ती सार्थ करण्याच्या ओढीने अलंकापुरीत दाखल झालेल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या एकलयीत पडणाऱ्या पावलांच्या साथीने, माउली माउली अशा जयजयकाराने मंगळवारी इंद्रायणीचे काठ दुमदुमले. भागवत धर्माची ध्वजा खांद्यावर पेलत, मुखी माउलींच्या ओव्या घोळवत वारकरी माउलींच्या पादुकांच्या दर्शनात रमले आणि सायंकाळी माउलींचा पालखी सोहळा प्रस्थानाला निघाला.

तत्पूर्वी समाधी मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधींना सुरुवात झाली. घंटानाद, काकडआरतीनंतर भाविकांच्या महापूजांना प्रारंभ झाली. त्यानंतर दर्शनबारी खुली करण्यात आली. महाप्रसादानंतर दर्शनबारी सुरू ठेवण्यात आली. रात्री उशीरा माउलींच्या पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. परंपरेनुसार, पहिला मुक्काम आळंदी येथील आजोळघरी असून २२ जून रोजी माउलींचा पालखी सोहळा तुकोबांच्या पालखी सोहळ्यासमवेत पुण्यनगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येणार आहे.प्रस्थानासाठी माउलींचे मानाचे अश्व मंदिरात आले. हैबतबाबांच्या वतीने आरती झाली. माउलींच्या चांदीच्या पादुका वीणामंडपात ठेवलेल्या पालखीमध्ये प्रतिष्ठापित केल्या. त्यानंतर प्रसाद वाटप झाला.

पालख्यांच्या मुक्कामी स्वागतासाठी मंदिर व्यवस्थापन मंडळ सज्ज
बुधवारी सायंकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या पुण्यनगरीत २ दिवसांच्या मुक्कामी असेल. भवानी पेठेतील विठोबा मंदिरात माउलींचा पालखी सोहळा विसावतो, तर नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. दोन्ही पालख्या शुक्रवारी मार्गस्थ होतील.