आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा... टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले.... 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी...अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.
आळंदी येथील समाधी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पुजेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे आदी उपस्थित होते.
मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी फुगडीचा फेर धरला. विणा व टाळ वाजवत वारकऱ्यांसह त्यांनी भजनातही सहभाग घेतला.
वारकऱ्यांसाठी सुविधा
आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.