आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाशी युद्ध:मुंबईच्या धर्तीवर पुण्यात तात्पुरते रुग्णालय उभारा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक पार पडली
Advertisement
Advertisement

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टरांबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीद्वारे करा. तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले.

शासकीय विश्रामगृहातील सभागृहात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होते. सध्या राज्यातील परिस्थिती अधिकच गंभीर अाहे. याशिवाय पुण्यातही माेठ्या संख्येत काेराेना रुग्णांमध्ये वेगाने वाढ हाेत अाहे. पवार म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे, कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच संस्थात्मक क्वॉरंटाइन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे सांगून पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पिटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरांचे नियोजन या सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करावे.

निधीची कमतरता भासणार नाही

कंटेनमेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण क्षेत्र मिळून एकाच पातळीवरून नियोजन करा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’ची गंभीर लक्षणे असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहिजेत, असे स्पष्ट निर्देशही अजित पवार यांनी दिले. प्रारंभी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. मुंबईत कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्था, बेड व्यवस्था तसेच डॉक्टरांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
0