आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काल एमपीएससीची राज्यसेवा पूर्ण परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्यभर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यींनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. पुण्यातील आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन नवीन तारीख जाहीर करण्यार असल्याचे सांगितले आणि त्यानुसार, येत्या 21 तारखेला परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि केंद्राच्या पथकातील सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील लॉकडाउन आणि एमपीएससीच्या गोंधळाबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, 'एमपीएससी प्रकरणी राजकारण करणे योग्य नाही. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला याबाबत दुमत नाही. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घातले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि तोडगा काढला.'
अजित पवार पुढे म्हणाले की, 'एमपीएससी स्वतंत्र संस्था आहे. हे प्रकरण त्यांनी व्यवस्थित हाताळायला हवे होते. त्यामध्ये एमपीएससी कुठेतरी कमी पडली. या प्रकरणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली हे दुर्दैव आहे. कोणतेही कारण नसताना विरोधकांनीही राजकारण केले, तेही दुर्दैव आहे. विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती. सरकार काहीतरी वेगळं करतं आहे, असे भासवण्याचे काम विरोधकांनी केले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातलं आणि एमपीएससीला सूचना केल्या. त्यानुसार आज एमपीएससीने नवीन परिपत्रक काढले,' असे पवार म्हणाले.
पुण्यात कोरोनामुळे लॉकडाउन नाही
पुण्यात लॉकडाउनच्या चर्चा सुरू असतानाच विभागीय आयुक्तांनी लॉकडाउन लागणार नाही असे गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. त्यामध्ये सरसकट लॉकडाउन न लावता केवळ कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. माझे महाराष्ट्र आणि पुण्याच्या जनतेला आवाहन आहे, की कोरोना आणि त्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांना गांभीर्याने घ्या. लसीकरणाला प्रतिसाद द्या. लोक नियमांचे पालन करत नसल्याने आपल्याला कडक निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतची संचारबंदी अत्यावश्यक सेवा सोडून आपण लागू केली आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.