आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रय योजनेबाबत राज्यपालांनी राज्य सरकारला झटका दिला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापालिकेच्या आश्रय योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांकडून महाराष्ट्राच्या लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या आश्रय योजनेमध्ये 1 हजार 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आता या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे.
आश्रय योजनेच्या राज्यपालांच्या चौकशीच्या आदेशांवर अजित पवार म्हणाले की, 'राज्यपाल ही महत्वाची व्यक्ती आहे. त्यांनी काय करायला हवे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सातत्याने खबरदारी घेत आहोत. सातत्याने लोकायुक्तांकडे तक्रारी केल्या जात आहेत. यामध्ये तथ्य असेल, तर वस्तुस्थिती सर्वांसमोर येईल, तथ्य नसेल तर त्यांच्याही लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीने तक्रारी केल्या जातात', असे म्हणत त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे.
मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत 1 हजार 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी आश्रय योजनेतील झालेला गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेतून पक्की घरे बांधली जातात. या योजनेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनते आतापर्यंत मुंबई महापालिकेने 1 हजार 844 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. मात्र त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.