आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी क्षेत्राचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी विचारत घेत पिकांचे वाण विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.
कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या 107 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपाध्यक्ष प्रकाश आंबिटकर, राज्यपाल नियुक्त सदस्य कृष्णा लव्हेकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी परिषदेचे अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखेडे, अर्चना पानसरे, महासंचालक रावसाहेब भागडे आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, कृषी विद्यापीठातून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण रोजगारांच्या संधी उपलब्ध करुण देणारे असावे. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी करण्यात यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देवून आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन संशोधन करुन कृषी विद्यापीठाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियानानुसार बाजाराच्या मागणीप्रमाणे पीक पद्धती विकसित करावी. तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन स्थानिक पीक पद्धती विकसित करण्यसाठी काम करावे.
सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी त्याबाबत संशोधन करुन सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु करावे. संत्रा व मोसंबी या फळापासून निर्मिती होणारे ज्यूस जास्त काळ कसे टिकवून ठेवता येईल याबाबत संशोधन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार पद्धतीचे रोप उपलब्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. आज पर्यंत एकूण २८ वाणांना भौगोलिक मानांकन मिळाले असून त्यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भौगोलिक मानांकन मिळालेल्या वाणांचे जतन व संवर्धन करावे. कृषी विभागाच्यावतीने मान्सूनचा अंदाज घेवून शेतकऱ्यांना वेळोवेळी पेरणीबाबत मार्गदर्शन करावे. पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याबाबत कृषी विभागाच्या मदतीने आपल्यास्तरावरुन आवाहन करावे.
बियाणे, रासायनिक खते, निविष्ठाबाबत वेळोवेळी आढावा घेवून त्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. आपल्याला याबाबत कुठेही गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी असे भुसे यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.