आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माेठमाेठ्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान हाेते म्हणून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे, अशी घोषणा केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यापेक्षा वरचढ निघाले. त्यांनी बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे असे सांगितले. परंतु, अद्याप शेतकऱ्यांना काेणतीच नुकसान भरपाई राज्य सरकारने दिली नसून राजा उदार नाही, ‘उधार’ झाला आणि हाती भाेपळा आला अशी परिस्थिती राज्य सरकारची निर्माण झाली असून प्रामाणिक शेतकऱ्यांना ठेंगा दाखवण्याचे काम सरकारने केले असल्याची टीका विराेधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
या वेळी फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना सहा हजार, आठ हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली, परंतु शेतकऱ्याला मूर्ख बनविण्याचे काम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. तेे आम्ही केलेल्या कर्जमाफीला नावे ठेवतात. परंतु वस्तुस्थितीनुसार, आमच्या याेजनेत ४२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. मात्र, सध्या ताे केवळ २९ लाख शेतकऱ्यांनाच झाला आहे. दरम्यान, शेतकरी आंदाेलनाबाबत ते म्हणाले, पंतप्रधान माेदी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. शेतकऱ्यांना जिथे माल विक्री करायचा आहे त्या ठिकाणी विक्री करता आली पाहिजे आणि त्याकरिता काेणती बंधने नसावीत. याकरिताच माेदी यांनी कृषी कायदे आणले आहेत.
मोदींच्या शेतकरी संवादाचे राज्यात ५ हजार ठिकाणी प्रक्षेपण :
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र भाजपतर्फे आयोजित केलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मोदींच्या या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे राज्यात सुमारे ५ हजार ठिकाणी आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती भाजप प्रदेश माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांनी दिली. प्रदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.