आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत यंदा माेठ्या प्रमाणात बाेगस मतदार नाेंदणी करण्यात आल्याचा आराेप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला हाेता. या प्रश्नावर विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्यावर टीका करत पदवीधरची निवडणूक ही ईव्हीएमने हाेत नसल्याने त्यावर खापर फाेडता येणार नाही, त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पाटील यांना डाेळ्यासमाेर पराजय दिसत असल्याने त्यांनी ‘कव्हर फायरिंग’ सुरू केली आहे. पदवीधरची मतदार नाेंदणी प्रक्रिया अवघड असताना बाेगस नाेंदणी कशा प्रकारे होईल, असा प्रश्न उपस्थित करत मतदार नाेंदणी प्रक्रिया किचकट असल्याने ती निवडणूक आयाेगानेच करावी अशी आमची मागणी हाेती, असे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, मागील दाेन दिवसांत तीन जिल्ह्यांत दाैरा केला. सरकारबद्दल असंताेष पाहण्यास मिळत असून ताे संघटित स्वरूपात व्यक्त हाेऊन मतदार भाजप उमेदवारास मतदान करतील, असे चित्र दिसत आहे. राज्य सरकारची निष्क्रियता, आश्वासनांची पूर्तता न करणे, अतिवृष्टीनंतर घाेषित केलेली नुकसान भरपाई न देणे, वीज सवलतीबाबत घूमजाव भूमिका, सरकारमधील विसंवाद, आरक्षणाचा गाेंधळ आदी कारणांमुळे जनता सरकारवर नाराज आहे. सरकारची वर्षपूर्ती होऊनही उपलब्धीसारखी काेणतीच गाेष्ट घडलेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत भाजप नेत्यांची गैरमालमत्ता असल्याबाबत केवळ यादी असल्याचे सांगतात. परंतु प्रत्यक्षात ती ईडीला पाठवत नाहीत. ईडीने पुरावा असल्यामुळेच शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून सरनाईक यांनी क्वाॅरंटाइनमध्ये जाण्यापेक्षा स्वत:हून तपास यंत्रणेसमाेर जाऊन सहकार्य केले पाहिजे. सरकारच्या आरक्षणाच्या गाेंधळामुळे आणि वेळकाढू धाेरणाने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. प्रवेश प्रक्रिया थांबली यास सरकार जबाबदार असून त्यांनी काेणत्याही समाजावर अन्याय न करता प्रवेश प्रक्रिया सुरू केली पाहिजे.
चार जणांचा प्रभाग याेग्य
सध्याचे सरकार निवडणुकीपूर्वी प्रभागरचना बदलाबाबत हालचाली करत आहे. यापूर्वी १५ वर्षे सरकार असताना त्यांनी तीन वेळा प्रभागरचना बदलली. मात्र, काहीही फायदा झाला नाही. आम्ही चार जणांचा प्रभाग केला. कारण, ज्या नगरसेवकांना आरक्षणामुळे निवडून येण्यास अडचण येते त्यांना प्रभाग पद्धतीद्वारे पुन्हा लढता येऊ शकते. तसेच पुरुष व महिलांना काम करण्यास समान व चांगली संधी उपलब्ध हाेते, असेही ते या वेळी बोलतना म्हणाले.
भाजपपेक्षा कोरोना परिस्थितीला आवरा : दरेकर
नागपूर| काेरोनामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लाॅकडाऊनबाबत सरकारचा गोेेंधळात गोंधळ सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपाला आवरण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी कोराेनामुळे हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आवरावे, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे भाजपाची नाव न घेता तक्रार केली होती. त्यावर दरेकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आधी कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे सुनावले. भाजपा जनतेच्या हिताची आंदोलने करीत आहे. त्यामुळे जनतेला वस्तुस्थिती माहिती होत असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.