आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 'सत्यमेव जयते फार्मर कप २०२२'च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते आमीर खान आणि किरण राव, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ आदी उपस्थित होते.
शेतीसमोर आव्हाने
फडणवीस म्हणाले, वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो.
आमीर खानचे शेतकऱ्यांसाठी माॅडेल
आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडून शेतीच्या क्षेत्रात क्रांती आणली. फाऊंडेशनने जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याच्या कार्यात सातत्य दाखवले आहे. त्यांनी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार करणे, विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे.
सोलर फिडरद्वारे शेतकऱ्यांना 12 तास वीज
दिवसा 12 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. यासाठी ॲग्रीकल्चर फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. यावर्षी 30 टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. पुढील दोन वर्षात उर्वरित फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील आणि शेतीसाठी दिवसा 12 तास वीज मिळू शकेल. यासाठी सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यात येईल. त्यासोबत फिडरजवळ असलेल्या शेतात काही पिकत नसेल तर अशी शेतजमीन सोलरसाठी 30 वर्षे भाड्याने घेण्यास शासन तयार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. 30 वर्षानंतर शेतकऱ्याला जमीन परत दिली जाईल. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळू शकेल.
फडणवीसांचे सहकार्य लाभले - आमिर खान
आमिर खान म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनच्या प्रवासात नेहमीच सहकार्य केले. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात. वैज्ञानिक आणि संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे. येत्या काळात महाराष्ट्रात आणि भारतात हजारो कृषि उद्योजक तयार व्हावेत. शेतीला व्यवसायाच्यादृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, यातील समस्यांवर मात करून पुढे जावे.
---
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.