आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव विशेष!:भाऊ रंगारी गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी; स्वामी नारायण मंदिराचा आकर्षक देखावा

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील जुना सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. ट्रस्टने यंदा दिल्लीतील श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारला असून ही प्रतिकृती पाहण्यासाठी गणेशभक्त आवर्जुन भेट देत आहेत. विशेष म्हणजे येथील आगळी-वेगळी गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

रंगारी बाप्पाचा आकर्षित देखावा

पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पासह प्रमुख आठ गणेश मंडळामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची गणना होते. या मंडळाने यंदा श्री स्वामी नारायण मंदिराची भव्य अशी प्रतिकृती साकारली आहे. मंदिरातील आतील बाजूस करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावा पाहण्यासाठी गर्दी वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी या दोन सुट्टीच्या दिवशी तर भाविकांनी अलोट गर्दी याठिकाणी केली होती.

राजकारणी लोकांसह अभिनेत्यांनी लावली हजेरी

दरम्यान दररोज कला, सामाजिक, राजकिय, शासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते बाप्पाची आरती होते. आजवर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रोहित पवार, जयंत पाटील, विश्वजित कदम, नाना पटोले, प्राजक्ता माळी, पूजा सावंत, दिपाली सईद, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, एआयएटीएफ'चे अध्यक्ष एम. एस. बिट्टा, गिरनार पर्वताच्या दत्त गुरू पीठाचे पिठाधीश महेश गिरी बापू यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणरायाची आरती करून दर्शन घेतले आहे. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, जान्हवी धारीवाल-बालन हे स्वत: रोज पहाटेपर्यंत मंडळात उपस्थित असतात.

रंगारी वाडा पाहण्यासाठीही गर्दी

श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृती जवळच श्रींमत भाऊसाहेब रंगारी वाडा आहे. उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी नुकतेच त्याचे नुतनीकरण केले आहे. या वाड्याच्या माध्यमातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधातील लढाचा इतिहास भाविकांना माहिती होत आहे. त्याच बरोबर ब्रिटिशांच्या विरोधात लढाईसाठी वापरलेली शस्त्रास्त्रे ही येथे पहायला मिळत आहेत. त्यामुळे या वाड्याला गणेश भक्त आवर्जून भेट देत आहेत.

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

गणेशोत्सवात दहा दिवस विविध सामाजिक उपक्रमही सुरू आहेत. आत्तापर्यंत मंडपात आरोग्य शिबीर, दंत तपासणी हे उपक्रम झाले असून आगामी काळात नेत्र शिबीर, फिजिओथेरपी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...