आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाबा गेल्यानंतर अवघ्या १३ वर्षांची दीदी आमची बाबा झाली. माई गेली तेव्हा ती आमची आई झाली. तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्या. आमच्यासाठी मात्र आमचं सर्वस्वच गेलं, असे सांगताना आशा भोसले यांना अश्रू आवरता आले नाहीत. मी दीदींपेक्षा चार वर्षांनी लहान होते. मी जणू तिची बाहुलीच होते. तिने माझ्यावर खूप प्रेम केले,’ असेही आशा भोसले म्हणाल्या.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत आशाताईंसह साऱ्यांनाच अश्रू आवरणे कठीण झाले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, गायक रूपकुमार राठोड, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित होते.
“स्वरमाउली’ लतादीदींचा मला ८० वर्षे सहवास लाभला. पण, खरे तर मला ती समजलीच नाही. कुसुमाग्रजांच्याच शब्दात सांगायचे तर ‘...परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले,’ अशीच तिच्या निधनाने माझी स्थिती झाली आहे, अशी भावना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.
देवदत्त स्वर लाभलेल्या लतादीदींचे अस्तित्व चिरंतन आहे. खडतर जीवनाचा धैर्याने सामना केलेल्या लतादीदी या आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच होत्या. त्यांचा हा वस्तुपाठ आपण आचरणात आणू शकलो तर ते आचरण हेच लतादीदींच्या अस्तित्वाची खूण असेल, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लता मंगेशकर यांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली. राठोड म्हणाले, की लतादीदींमुळे आपल्याला साक्षात ईश्वराचा सहवास लाभला. माझ्यावर लतादीदींनी आईसारखं निर्व्याज प्रेम केले.
तू दिलेल्या पैशांतून गरिबांवर उपचार होतील
आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतील का, असे मी दीदीला विचारले होते. त्यावेळी ‘तुझ्याकडे पैसे नाहीत का?’ असा प्रतिप्रश्न करून ‘तू दिलेल्या पैशांतून गरिबांवर उपचार होतील,’ हे तिने मला सांगितले होते. आशा भोसले, ज्येष्ठ गायिका
तोपर्यंत लतादीदींचे अस्तित्व : डॉ. मोहन भागवत
भागवत म्हणाले, लहान वयापासून लतादीदींनी खडतर जीवनाचा धैर्याने सामना केला. अंधाराला प्रकाशामध्ये रूपांतरित केले. शुचिता, अनुशासन, करुणा, खडतर तपश्चर्या या गुणांच्या आधारे त्यांनी प्रतिकूल जीवनही सुंदर बनवले. वडिलांच्या वाट्याला आलेल्या दुःखाची सल त्यांच्या मनात होती. मात्र, त्यामुळे कटुता येऊ न देता विधायक प्रतिक्रिया म्हणून त्यांनी वडिलांच्या नावाने रुग्णालय उभारले. दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामासाठीही त्यांनी निधीचा पुरवठा केला. त्यांच्या निधनाने सर्वांना तणावमुक्त करणारा स्वर हरपला. मात्र, जोपर्यंत स्वर राहतील, तोपर्यंत लतादीदींचे अस्तित्व कायम राहील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.