आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या भूमिकेवर वळसे पाटलांची प्रतिक्रिया:म्हणाले - अजानचा भोंगा म्हणून हनुमान चालिसा लावणे हा विकासाचा मुद्दा नाही; धर्मात वाद निर्माण केल्याने देश होईल खिळखिळा

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मॅक्सनोव्हा हॉस्पिटलचे उद्घाटन आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता, टीकास्त्र सोडले. विकासावर भाष्य करणे सोडून मशिदीवरील अजानवर आणि हनुमान चालिसावर बोलण्यात येत आहे. अशा संवेदनशील विषयावर भाष्य करून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे वळसे पाटील म्हणाले. यातून राजकारण अस्थिर होणार नाही तर धर्माधर्मात, दोन वर्गात वाद निर्माण केल्याने देश खिळखिळा होवून देशाचे तुकडे यातून पडू शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

देशात सध्या महागाई वाढली आहे. इंधनाचे दर गगनाला टेकले आहेत. तसेच बेरोजगारीचा प्रश्न आहे. पण, हे सर्व सामान्याचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करण्यात येत आहे. समजा-समाजामध्ये अंतर निर्माण करण्यात येत आहे. तसेच मोठा विषय घेऊन रस्त्यावर उतरत असून आंदोलन करण्यात येत आहे आणि पुन्हा राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्यात येत आहे, असे वळसे पाटील यांनी म्हटलं.

डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे

अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, भोंगे काढावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागले. अन्यथा आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचवू, असा इशारा दिला होता. त्यावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही, असे वळसे पाटील म्हणाले. तसेच प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे. अजानचे भोंगे लावायचे आहेत. लावा, पण त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायचा आहे, त्यांनीही जरुर लावावा, पण तिकडे होते त्याचवेळी लावू हे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.

राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवतीर्थावरील पाडवा मेळाव्यात बोलताना केला होता. यावर वळसे पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. मागील कित्येक वर्षे राजकारणात राहून विविध जातींमध्ये एकता साधण्याचेच काम ते करत आले आहेत. त्यामुळे अशा ज्येष्ठ नेत्यावर टीका करणे योग्य नाही, असे वळसे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...