आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘राम तेरी गंगा मैली’ अशा लोकप्रिय चित्रपटांच्या चित्रीकरणाचे विविध किस्से, राज कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वातील लहरीपणा, मेहनत, त्यांचे खाद्य पदार्थाबाबतचे प्रेम आणि माणुसकी असे अनेकविध पैलू आणि चित्रपट निर्मितीच्या विविध तंत्रांचा प्रवास आज पुण्यात उलगडला. पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित ‘मास्टर क्लास'मध्ये रवैल यांनी सोमवारी उपस्थितांशी संवाद साधला.
रवैल यांनी राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ते म्हणाले , " मी किशोरवयीन असताना ऋषी कपूर आले आणि म्हणाले की, राज कपूर सर्कसचे चित्रीकरण करत आहेत. सर्कसच्या त्या जवळपास ५००० लोकं असलेल्या सेटवर राज कपूर एकट्याने सर्वांना सांभाळत होते. अतिशय सहजतेने पण तितक्याच प्रभावीपणे ते सर्व करत होते, ते पाहून मी अचंबित झालो आणि त्याचवेळी त्यांच्यासोबत काम करायचे असा निश्चय केला."
राज कपूर यांच्या 'डंबारा नाईटस ' बद्दल रवैल म्हणाले, "डंबारा नाईटस म्हणजे ज्यावेळी राज कपूर आपल्या खाजगी थिएटरमध्ये बसून आपल्या चित्रपटांच्या आवडत्या सीन्सच्या चित्रफिती पुन्हा पुन्हा बघत असत. चित्रपटात त्यांनी वापरलेले तंत्र, चित्रकरणाचे विविध पैलू अशा अनेक गोष्टींचे ते बारकाईने निरीक्षण करत. मी देखील त्यांच्यासोबत बराच वेळा त्या ठिकाणी उपस्थित असे. या नाईटसमधून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या."
राज कपूर यांच्या चित्रपटात संगीत हा महत्वाचा भाग होता. चित्रपटातील संगीत त्याच्या कथेला साजेसे असावे हे ते मानत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील संगीत हे अधिक प्रभावी ठरते. गाण्याच्या रेकॉर्डींग वेळीदेखील त्यांच्या डोक्यात त्या गाण्याच्या प्रतिमा अतिशय स्पष्ट असत, असे रवैल म्हणाले.
कार्यक्रमात रोहन प्रकाशनतर्फे राहुल रवैल यांनी लिहिलेल्या 'राज कपूर - दि मास्टर अॅट वर्क ' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. जब्बार पटेल आणि सिनेमाटोग्राफर व दिग्दर्शक शाजी करुन यांच्या हस्ते हे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेकर आणि पुस्तकाचे अनुवादक मिलिंद चंपानेरकर हे उपस्थित होते.
-----
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.