आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:खडकवासला धरणातून 11 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग, यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणातून पाणी सोडले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदूर-मधमेश्वरमधून सर्वाधिक 16 हजार 865 क्युसेकने गुरुवारी विसर्ग

पुणे जिल्हा परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणसाखळीतील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. पुण्याजवळचे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून गुरुवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणातून पाणी सोडले जात आहे. यंदा पावसाचे सुरुवातीचे महिने कोरडे गेल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावला होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून चित्र बदलले आहे. पावसाची कृपा झाल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच धरणसाखळीतील पाणीसाठा समाधानकारक रीतीने वाढत आहे. गुरुवारी सकाळी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले.

> ६ दरवाजे प्रत्येकी एक फूट उचलून मुठा नदीत ५,१३६ क्युसेक वेगाने पाणी साेडले.

> पावसाचा जाेर कायम राहिल्याने सायंकाळी ५.३० वाजता विसर्ग वाढवून ११,७०० क्युसेक वेगाने पाणी साेडले.

नांदूर-मधमेश्वरमधून सर्वाधिक १६ हजार ८६५ क्युसेकने गुरुवारी विसर्ग

नाशिक | जून-जुलैमध्ये जिल्ह्यावर पाठ फिरवलेल्या वरुणराजाने ऑगस्टमध्ये जिल्ह्यावर कृपा केली आहे. गत दोन-तीन दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू असून गुरुवारी धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या इगतपुरीत १४५ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये ६६ आणि पेठमध्ये ७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ झाली असून गंगापूरचा साठा ६० टक्के झाला आहे. नांदूर मधमेश्वरमधून गुरुवारी सायंकाळी ६ वाजता एक वेळ १६ हजर ८६५ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. ८ वाजता तो कमी करत ९ हजार ९५६ क्युसेकने करण्यात आला.

अन्य धरणांची स्थिती अशी :

  • ७६% पानशेत धरण
  • ६२% वरसगाव
  • ४९% टेमघर
  • इगतपुरीत १४५, तर त्र्यंबक ६६ आणि पेठमध्ये ७७ मिमी पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ.
  • गंगापूर धरणाचा पाणीसाठा ६० टक्क्यांवर, दारणा धरण ९२ % भरले.
बातम्या आणखी आहेत...