आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हकोरोनामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी पूर्वपदावर:राज्य मुद्रांक विभागाची महसुली झेप 40 हजार कोटींकडे

मंगेश फल्ले | पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 32 हजार काेटींच्या महसुलाचे लक्ष्य पार करत आतापर्यंत 34 हजार काेटींचा महसूल जमा

काेराेनानंतर विस्कळीत झालेली राज्यातील आर्थिक घडी पूर्वपदावर येऊन विकासाच्या दिशेने झेपावत आहे. राज्य नाेंदणी व मुद्रांक विभागाच्या महसूल उत्पन्नाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. यंदा महसूल विभागाने ३२ हजार काेटींचा महसूल जमा करण्याचे लक्ष्य ठेवले हाेते. ते पार करत आतापर्यंत ३४ हजार काेटींचा महसूल तिजाेरीत जमा झाला आहे. तर, महिनाभरात महसुलाचा हा टप्पा ४० हजार काेटी रुपयांपर्यंत धडक मारेल, असे संकेत मुद्रांक विभागाने दिले आहेत. त्यामुळे महसूल मिळवून देण्यात दुसऱ्या क्रमांकाचा विभाग म्हणून ओळख असलेला महसूल विभाग शासनाच्या विकासनिधीत यंदा दमदार हातभार लावणार असल्याचे संकेत आहेत.

चालू वर्षात २२ लाख ६३ हजार ९५८ दस्त नाेंदणीतून ३४ हजार काेटींचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला. आणखी महिनाभरात माेठया प्रमाणात दस्त नाेंदणी अपेक्षित असल्याने हा टप्पा ४० हजार काेटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध शहरांत तसेच विस्तारित भागांत माेठ्या प्रमाणात वस्त्या वाढत आहेत. ग्रामीण नागरिकांच्या स्थलांतरामुळे नागरीकरण वाढत आहे. परिणामी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढून नाेंदणी व मुद्रांक विभागाकडे महसूल जमा हाेण्याचे प्रमाण वाढत आहे. नवीन-जुनी घरे, जमीन, दुकाने आदीची खरेदी-विक्री, रेडिरेकनर, करार नाेंदणी, भाडेकरार आदी गाेष्टींच्या माध्यमातून महसूल विभागाकडे कर जमा हाेत असताे.

हाैसिंग क्षेत्रात तेजीचा परिणाम
^काेविडनंतर मुद्रांक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. घरबांधणी क्षेत्रात तेजी राहिल्याने महसुलाचे प्रमाण वाढले. पुणे, मुंबई, नाशिक, रायगड आदी भागांत प्रामुख्याने व्यवहार अधिक प्रमाणात झाले आहेत. यंदाच्या वर्षी मुंद्राक विभागाचे लक्ष्य ३२ हजार काेटी रुपये महसूल जमा करण्याचे हाेते. परंतु, मार्चअखेरपर्यंत ते ४० हजार काेटींपर्यंत जाईल, असे अपेक्षित आहे.
- श्रावण हर्डीकर,
आयुक्त राज्य नाेंदणी व मुद्रांक विभाग

बातम्या आणखी आहेत...