आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​कोरोना रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर झाड लावण्याचा सल्ला; ऑक्सिजन वाढवण्यासाठी अहमदनगरचे वैद्य कासार यांनी घेतला पुढाकार

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैद्य युवराज कासार आणि त्यांच्या पत्नी वैद्य कोमल कासार हे दोघेही गेल्या बारा वर्षांपासून संजीवनी हॉस्पिटल चालवतात.

सध्या सगळीकडेच कोरोना पेशंटना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची खरी किंमत आता आपल्याला कळत आहे. अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या अहमदनगरमधील एका डॉक्टरने रुग्णांना ऑक्सिजनचे महत्त्व कळावे म्हणून एक शक्कल लढवली आहे. पेशंटला गोळ्या लिहून दिल्यानंतर प्रिस्क्रिप्शनवर ‘या आजारातून बरे झाल्यावर किमान एक तरी झाड लावा’ असा सल्ला डॉक्टर देत आहेत. अहमदनगर येथील संजीवनी रुग्णालयाचे डॉक्टर युवराज कासार यांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषधांच्या जोडीने लिहिलेला मजकूर सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. औषधांची नावे आणि ती कशी घ्यायची हे लिहिल्यावर खालच्या बाजूला वैद्य कासार यांच्या हस्ताक्षरातला ‘आजारातून बरे झाल्यावर एक झाड लावा. तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही’ हा मजकूर लक्षवेधक ठरला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक आणि अन्य समाजमाध्यमांच्या व्यासपीठांवर हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल झाले आहे. यासंदर्भात वैद्य युवराज कासार म्हणाले, ‘कोविड संकटाच्या काळात गेल्या महिन्याभरापासून आमच्या संजीवनी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर अगदी सहज म्हणून हा मजकूर लिहिला होता. आजही लिहितो. वैद्यकीय व्यावसायिक असल्याने उपचारांमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व अर्थातच जाणून आहे. मी आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे. आमची बहुसंख्य औषधे थेट वनस्पती, वृक्ष, वेलींपासूनच बनवली जातात. ‘नास्ति मूलं अनौषधम्’ हे वचनही सर्वज्ञात आहे. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन झाडे देतात हेही आपल्याला माहिती आहे.

तरीही वैयक्तिक स्वार्थामुळे आपण झाडे तोडतो आहोत. जंगले नष्ट करत आहोत. आज आपण श्वास घेऊ शकतो आहोत. पण ज्या गतीने आपण निसर्गाचा नाश करत आहोत ते पाहता पुढच्या पिढ्यांचा श्वास कसा असेल याची शंका वाटते. स्वत: निसर्गप्रेमी असल्याने मी रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवरच झाडांचे महत्त्व सांगणारा संदेश लिहायला सुरुवात केली. कारण, माझ्या संपर्कात रुग्णच अधिक असतात. त्यांच्यामार्फत मी हा झाडे लावण्याचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

डॉक्टर दांपत्याची एक तप सेवा
वैद्य युवराज कासार आणि त्यांच्या पत्नी वैद्य कोमल कासार हे दोघेही गेल्या बारा वर्षांपासून अहमदनगरपासून दहा किलोमीटर अंतरावरच्या वाळकी येथे संजीवनी हॉस्पिटल चालवतात. ते निसर्गप्रेमी आहेत. औषधी वनस्पतींचे जाणकार आहेत. कोरोना संसर्गाच्या संकटात हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना औषधे लिहून देताना झाडे लावण्याचा, जपण्याचा संदेश देऊन त्यांनी वैद्यकीय सेवेसह सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

बातम्या आणखी आहेत...