आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वयाच्या नवव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरवल्याने दहावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण होईल किंवा नाही अशी परिस्थिती असलेल्या मुलीची आता राज्यातील दहावी-बारावीच्या प्रत्येक प्रमाणपत्रावर स्वाक्षरी आहे. ही मुलगी म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे. गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी त्या निवृत्त होत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातले घोडेगाव हे डॉ. शकुंतला काळे यांचे मूळ गाव. वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आई शेती करायची. आईने काबाडकष्ट करीत शकुंतला यांना दहावीपर्यंत शिकवले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच लग्नाची तयारी सुरू झाली, परंतु शकुंतला यांना उच्च शिक्षणाची तीव्र इच्छा होती. त्यामुळे पुढे शिक्षण सुुरू राहिले तरच बोहल्यावर चढेन, अशी अटच सासरच्या मंडळींना त्यांनी घातली. सन १९७८ चा हा काळ.
छोट्याशा खेड्यातील मुलीने त्या वेळी सासरच्या मंडळींसमोर अशी अट ठेवणे हेसुद्धा धाडसच होते. परंतु मुलीचे धाडस पाहून सासरे मारुती गावडे यांनी मोठ्या मनाने त्याला संमती दिली. शकुंतला यांचे पती आनंद गावडे वडगाव मावळ तालुक्यात शिक्षक. गावात शैक्षणिक सुविधांचा अभाव असूनही डीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेत शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या. त्यानंतर नोकरीसोबत बीए, एमए असे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. परंतु पती-पत्नी दोन्ही वेगळ्या गावात नोकरीस असल्याने मुलांचे संगोपन करताना खूपच अवघड जात होते. पतीची बदली होत नसल्याने अखेर शकुंतला यांनी माध्यमिक शाळेतील शिक्षिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला अन् त्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.
जिद्दीचा प्रवास : प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची नोकरी करतानाच त्यांनी शिक्षणही सुरूच ठेवले. सन १९९३ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या साेलापूरला माध्यमिक उपशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर मात्र शकुंतला काळे यांनी मागे वळून पाहिले नाही. राज्याच्या स्त्री शिक्षण विभागप्रमुखपदी काम करताना त्यांनी लिंगभाव समानतेवर प्रामुख्याने काम केले. त्याची राज्यभरात दखल घेण्यात आली. पुणे, कोकण येथील शिक्षण मंडळात काम करताना त्यांनी कॉपीमुक्त परीक्षा, सर्वंकष मूल्यमापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
पुढे शिकवू; सासऱ्यांची मंडपात घोषणा
शकुंतला काळे यांना शिक्षणाबद्दलची असलेली तळमळ पाहून त्यांचे सासरे मारुती गावडे यांनी लग्नमंडपातच मुलीस आम्ही पुढे शिकवू, असे जाहीर केले होते. त्यानंतर शकुंतला यांचा लग्नसोहळा पार पडला होता. सासरेबुवांच्या वचनानुसार शकुंतला यांच्या पतीने संसारासोबतच शिक्षणास तोलामोलाची साथ दिली.
प्रतिकूल परिस्थितीच यशाची किल्ली
काेविड काळात ३४ लाख विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षेचे निकाल लावणे हे आजवरचे सर्वात कठीण आव्हान हाेते. सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न केले तर यश मिळते, त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत गेल्याने मला जीवनात माेठी वाटचाल करता आली. सेवानिवृत्तीनंतर साहित्य क्षेत्रात लिखाणाचे काम करण्याचे मी ठरवले आहे. - डाॅ. शकुंतला काळे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.