आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीट्रॅप:DRDO चा संचालक हनीट्रॅपमध्ये अडकला; पुण्यात एटीएसकडून अटक, महिला समजून ISI गुप्तहेराला दिली गोपनीय माहिती

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदीप कुरुलकर - Divya Marathi
प्रदीप कुरुलकर

पुण्याच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) संचालक तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना दहशतवादविरोधी प्रतिबंधक पथकाने (एटीएस) अटक केली आहे. पाकची गुप्तचर संघटना अायएसआयच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकर यांनी संरक्षण विभागाची संवेदनशील माहिती पाकिस्तानास पुरवल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे कुरुलकर यांच्या निवृत्तीला सहा महिनेच शिल्लक असताना हनीट्रॅपसारख्या प्रकारात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील डीआरडीओ कार्यालयात बुधवार, ३ मे रोजी ड्यूटीवर असताना कुरुलकर यांनी पाकिस्तानी आयएसआयच्या हस्तकाशी व्हाॅट्सअॅप व्हाॅइस मेसेज आणि व्हिडिओ कॉलवर संपर्क साधून त्याला संरक्षण दलाची अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती पाठवली. कुरुलकरविरोधात मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मोहापायी देशद्रोह

कुरुलकर हे फेसबुक व व्हॉट्सअॅप मेसेज, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आले. प्रत्यक्षात महिलेचे छायाचित्र असलेले ते बनावट फेसबुक खाते होते. ते एक आयएसअाय हस्तक चालवत होता. महिलेच्या नादाने कुरुलकर चॅटमध्ये गोपनीय माहिती पुरवत होते. डीअारडीओच्या कार्यालयात बसूनही हे उपद्व्याप सुरू होते.

कलाम यांच्यासोबत केले काम
क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, लष्करी उपकरणे, रोबोटिक्स व लष्करात उपयोगी ठरणाऱ्या मानवरहित मोबाइल तंत्रज्ञान, उपकरणांचे डिझाइन तसेच विकासात कुरुलकर यांचे प्रावीण्य होते. त्यांनी ६ वर्षे दिवंगत शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासमवेत विविध प्रकल्पांत काम केले होते. सन १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने पोखरण येथे केलेल्या अणुस्फोट चाचण्यांसाठी निवडलेल्या ३५ शास्त्रज्ञांमध्ये त्यांचाही समावेश होता. मात्र निवृत्तीला ६ महिने बाकी असताना हनीट्रॅपमध्ये अडकल्याने त्यांच्या कारकीर्दीला बट्टा लागला.