आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे आषाढी वारीच्या नियोजनाची तयारी सुरु झाली आहे. वारीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वारी सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी महापालिका हद्दीत वारीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. महापालिका दुरसंचार विभाग आणि पोलिस प्रशासन एकत्रितपणे या ड्रोनचे नियोजन करणार आहे. तसेच, शहरातील वारीच्या मार्गांवर फिरती कॅंट्रोल रुमही स्थापन करण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात २१ जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे, तर २२ जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखींचे आगमन होणार आहे. २१ जून रोजी आकुर्डी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरात पालखींचे आगमन आणि मुक्कामाच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिका, पोलिस आणि पालखी सोहळ्याचे प्रमुख प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत वारीच्या सुरक्षिततेवर जास्त भर देण्यात आला. वारीसाठी लागणाऱ्या सुविधा पुरवणे, मुक्काच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे, अशा विविध गोष्टींवर बैठकीत चर्चा झाली. या चर्चेमध्ये महापालिका हद्दीतील पालखी मार्गावर ड्रोनद्वारे लक्ष ठेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आणि मार्गावर फिरत्या स्वरुपाची कंट्रोल रुम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
फिरती शौचालये आणि टॅंकर
महापालिकेच्यावतीने पालखी मुक्काम, विसावा आणि मार्गावर विविध ठिकाणी फिरती शौचालये, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व बर्निंग मशीन ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी टँकरची सोय करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती तसेच इतर नियोजनाच्या दृष्टीने मुक्कामाच्या ठिकाणी मुख्य कंट्रोलरूम तसेच पालखी मार्गावर फिरत्या कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने अग्नीशामन सेवा, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार असून प्रत्येक २०० मीटर अंतरावर अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.
आषाढी वारी पालखी सोहळ्याकरीता मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपआयुक्त विठ्ठल जोशी तर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त सचिन ढोले यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.