आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:दिवाळीच्या सुट्यांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, राज्याबाहेर पर्यटनास जाणारी संख्या यंदा 50 टक्केच

मंगेश फल्ले | पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना संसर्गामुळे यंदा ग्रुप पर्यटनापेक्षा वैयक्तिक पर्यटनात मोठी वाढ

काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊनची परिस्थिती देशासाेबतच राज्यात निर्माण झाली आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. यादरम्यान पर्यटनासाठी देशात आणि परदेशात गेलेल्या पर्यटकांची काेंडी झाली आणि विविध अडचणींचा सामना करत ते घरी पाेहोचले हाेते. त्यानंतर सहा ते सात महिन्यांपासून पर्यटनाची काेंडी झाली हाेती. परंतु दिवाळीच्या सुट्यांमुळे पर्यटनात वाढ झाली असून राज्यभरातील पर्यटन केंद्रे हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनची नियमावली अद्याप राबवण्यात येत असल्याने ग्रुप पर्यटनापेक्षा वैयक्तिक पर्यटनात वाढ झाली आहे.

महाबळेश्वर, माथेरान, लाेणावळा, अलिबाग, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, दापाेली, तारकरली, गाेवा, काेकण किनारपट्टी भागातील पर्यटन केंद्रांना प्रामुख्याने पर्यटकांची पसंती मिळत आहे. काेराेना रुग्णसंख्या सध्या कमी झाल्याने, निर्बंध शिथिल झाल्याने आणि अनेक महिने घरात बसून कंटाळल्याने नागरिक एक ते चार दिवसांपर्यंतच्या पर्यटनाला घराबाहेर पडत असल्याचे मत पर्यटन व्यावसायिक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, दार्जिलिंग या ठिकाणी काेराेना रुग्णसंख्या कमी असल्याने राज्यभरातील पर्यटक या राज्यांमध्ये पर्यटनासाठी सहकुटुंब व मित्रमंडळीसह जात आहेत. केंद्र सरकारने पर्यटनाची सर्व ठिकाणे खुली केली असली तरी काही राज्यांत विविध प्रकारचे प्रवासी नियम असल्याने अद्याप ग्रुप पर्यटनाला मर्यादा येतात. पर्यटनस्थळावरील गाइड, हाॅटेल व्यावसायिक, लाॅजिंग, किरकाेळ विक्रेते यांच्यासह स्थानिकांना राेजगार मिळू लागल्याने काेराेनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत आहे. थंड हवेची ठिकाणे, समुद्रकिनारे यांना पर्यटकांची प्रामुख्याने पसंती मिळत असतानाच गिरिभ्रमण व साहसी पर्यटनालाही पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

राज्याबाहेर पर्यटनास जाणारी संख्या यंदा ५० टक्केच

अभिनव टूर्स अँड ट्रॅव्हलस कंपनीचे अमाेल परचुरे म्हणाले, काेराेनामुळे अनेक महिन्यांपासून लाेक घरात बसून राहिल्याने व कामाचा ताणतणाव असल्याने लाेकांना पर्यटनासाठी बाहेर पडता येत नव्हते. परंतु रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि दिवाळीच्या सुटीमुळे पर्यटकांची पसंती पर्यटनास मिळत आहे. निवासी हाॅटेलच्या ठिकाणी काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटाइझवर भर दिला जात आहे. ग्रुप टूरवर मर्यादा असल्या तरी वैयक्तिक पर्यटन व्यवस्थित सुरू झाले आहे. मागील वर्षीच्या दिवाळी सुटीतील पर्यटनाच्या तुलनेत यंदा राज्याबाहेर जाणारे पर्यटक ५० टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून येत आहे. पर्यटन नियमावली स्पष्ट झाल्यानंतर पर्यटनात वाढ होईल.

बातम्या आणखी आहेत...