आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट रेमडेसिविर:रेमडेसिविर बाटल्यांत पॅरासिटामॉलचे पाणी टाकून 35 हजार रुपयांना विक्री, बारामतीत 4 भामट्यांना अटक

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • , आरोग्य विमा एजंट म्होरक्या

रेमडेसिविरचा तुटवडा आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांच्या असहायतेचा फायदा उचलून बारामती तालुक्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरलेल्या बाटल्यांमध्ये पॅरासिटामॉल या औषधाचे पाणी भरून ‘बनावट रेमडेसिविर’ विकणाऱ्या एका टोळीचा बारामती पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका आरोग्य विमा एजंटासह चार भामट्यांना अटक करण्यात आली. हा विमा एजंट काटेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडून बनावट इंजेक्शनच्या तीन बाटल्याही जप्त करण्यात आल्या.

प्रशांत सिद्धेश्वर घरत (२३, रा. इंदापूर, पुणे), शंकर दादा भिसे (२२, रा.काटेवाडी, बारामती), दिलीप ज्ञानदेव गायकवाड (३५, रा. काटेवाडी, बारामती), संदीप गायकवाड (२०, रा.भिगवण, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत.

रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची खबर बारामती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीचा फोन नंबर मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक बनून त्याच्याशी संपर्क साधला. एक इंजेक्शन ३५ हजार रुपयांत मिळेल असे त्याने सांगितले. त्यानुसार ७० हजारांमध्ये दोन इंजेक्शन खरेदी करण्याचे ठरले.

बारामतीमधील फलटण चौकात इंजेक्शन देण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता, पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कार (एमएच ४२ ए पी ९६९६) मधून दोन जण त्या ठिकाणी आले. बनावट ग्राहकामार्फत औषध खरेदी सुरू असताना त्याच वेळी पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. प्रशांत घरत आणि शंकर भिसे यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी दिलीप गायकवाड याने इंजेक्शन विक्रीस दिल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी गायकवाड या मुख्य आरोपीस अटक केली.

फेविक्विकने सीलबंद : बनावट रेमडेसिविर टोळीचा म्होरक्या आरोग्य विमा एजंट दिलीप गायकवाड आहे. त्याच्या आेळखीतील संदीप गायकवाड हा पूर्वी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार, वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. रुग्णालयात वापरून झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून तो त्यात सिरिंज साह्याने पॅरासिटॅमॉल औषधाचे पाणी भरून फेविक्विकने बाटली पुन्हा सील करायचा. ही बाटली दिलीप गायकवाडकडे देत असे. यासाठी संदीपला एका बाटलीमागे १० ते १२ हजार रुपये मिळत होते.

बीडच्या २ भावांना अटक
पुणे |रेमडेसिविरची बेकायदा विक्री करणाऱ्या दोन सख्या भावांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन व दुचाकी जप्त केली. प्रदीप देवदत्त लाटे (२५), संदीप देवदत्त लाटे (२३, दोघेही सध्या रा. बालेवाडी, मूळ रा. बेलुरा, बीड) अशी संशयितांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...