आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ:पुण्यातील कार्यालयाला ईडीची नोटीस, 10 दिवसांत मालमत्ता रिकामी करण्याचे आदेश

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर आता ईडीने त्यांच्या पुण्यातील कार्यालयाला नोटीस पाठवली आहे. 10 दिवसांत मालमत्ता रिकामी करण्याचे या नोटीशीत सांगण्यात आले आहे.

डीएचएफएल आणि येस बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणात सीबीआयव्यतिरिक्त ईडीही तपास करत आहे. या प्रकरणात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (ABIL) चे कॉर्पोरेट कार्यालय असलेल्या एआरए मालमत्तेची चार कोटी रुपयांची मालमत्ता ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. भोसले हे एबीआयएलचे प्रवर्तक आहेत. या मालमत्ता जप्तीला आता न्यायनिवाडा करणार्‍या अधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ईडीने भोसले यांना मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे, जेणेकरून ईडी ही मालमत्ता जप्त करू शकेल.

अविनाश भोसले यांना सीबीआयने गुरुवारी अटक केली होती. 8 जूनपर्यंत त्यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासासाठी सीबीआयने अविनाश भोसले यांना दिल्लीत नेले आहे.

आतापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता जप्त

डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ईडीने अविनाश भोसले यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यामध्ये भोसले यांचे विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कमदेखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील हॉटेल वेस्टिन, नागपूरमधील हॉटेल ली मेरिडियन आणि गोवा येथील हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी पदाचा दुरुपयोग करून डीएचएफएलला फायदा पोहोचवल्याचे हे प्रकरण आहे. यात कर्जाऊ रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. 2018 मध्ये एप्रिल ते जूनदरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. यात बड्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश असल्याचे सीबीआय सूत्रांचे म्हणणे आहे. याच प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...