आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
खासगी शाळांकडून करण्यात आलेल्या अवाजवी शुल्कवाढीविरोधात पालक आक्रमक झाले असून, शिक्षणमंत्र्यांकडून यासंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बुधवारी शिक्षणमंत्र्यांना पुण्यात स्वत:च्या नावाने ‘हाय हाय’च्या घोषणा ऐकाव्या लागल्या. पालक संघटनेकडून शिक्षणमंत्र्यांना शुल्कवाढीसंदर्भात निवेदन देण्यात आले. मात्र, यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून योग्य खुलासा न मिळाल्याने पालक संतप्त झाले आणि त्यांनी शिक्षणमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परिणामी शिक्षणमंत्र्यांना दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडावे लागले.
राज्यात अनेक खासगी शाळांनी शुल्कवाढ केली आहे. कोरोना संकटातून बाहेर पडत असताना, या अवाजवी शुल्कवाढीमुळे पालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी बालभारती येथे नियोजित कार्यक्रमासाठी येणार असल्याने त्यांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी पालक संघटनांचे प्रतिनिधी जमले होते. मात्र, शिक्षणमंत्र्यांनी शुल्कवाढीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर समाधानकारक उत्तर न दिल्याने संतापलेल्या पालकांनी त्यांच्याविरोधात बालभारतीच्या आवारात घोषणा दिल्या.
खासगी शाळांनी केलेल्या मनमानी शुल्कवाढीसंदर्भात राज्य सरकार न्यायालयीन लढाई लढत आहे. मनमानी शुल्क वसूल केले जाऊ नये, असा अध्यादेशही सरकारने काढला आहे. मात्र, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने, न्यायप्रविष्ट मुद्द्याविषयी भाष्य करणे शक्य नाही, असे उत्तर गायकवाड यांनी दिले.
वर्षभरात बालभारती’ची स्वतंत्र वाहिनी सुरू करावी : विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमांतून शिक्षण आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने पोचवण्यासाठी ‘बालभारती’ची स्वतंत्र वाहिनी सुरू करावी, अशी सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी केली. संस्थेच्या पुढच्या वर्धापनदिनापर्यंत अशा स्वतंत्र वाहिनीचे काम पूर्ण करावे, असेही त्या म्हणाल्या. यावर संचालक दिनकर पाटील यांनी ‘पुढच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम नव्या वाहिनीवरच करू’, असे म्हणत ही सूचना स्वीकारली.
प्रकरण कोर्टात असल्याने भाष्य नाही : गायकवाड
पालक संघटनेच्या अध्यक्ष जयश्री देशपांडे म्हणाल्या, ‘खासगी शाळांच्या अवाजवी शुल्कवाढीसंदर्भात राज्य शासनाने कुठलाही ठोस निर्णय आजवर घेतलेला नाही. त्यामुळे आता आम्ही थेट शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेरच आंदोलन करणार आहोत. शिक्षकभरती घोटाळ्यासंदर्भात गायकवाड म्हणाल्या, ‘या घोटाळ्यात ज्यांची नावे आहेत, त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. पोलिसांकडून अद्याप तपास सुरू आहे. तपासानंतर जे दोषी आढळतील, त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. शुल्कवाढीसंदर्भात जिल्हा परिषद आणि मनपा तसेच राज्य बोर्डाच्या कुठल्याही शाळेबाबत तक्रार नाही. खासगी शाळांबाबत तक्रारी असल्या तरी बाब न्यायालयात असल्याने, निर्णय होईपर्यंत भाष्य करता येत नाही.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.