आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेला लग्नाच्या जाळ्यात अडकवून आठ लाखांची फसवणूक:शादी डॉट कॉमवरून झाली होती ओळख; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसर्‍या लग्नासाठी जोडीदार शोधत असणार्‍या शिक्षिकेला एकाने विदेशातून भारतात आल्याची बतावणी करून डॉलर करन्सी बदल्यासाठी खात्यावर तब्बल 8 लाख 10 हजार भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशील कुमार दुबे (रा. पश्चिम दिल्ली) आणि विजया रिखेश्वर चेतीया (रा. आसाम) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 39 वर्षीय महिलेनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला एका शाळेत शिक्षिका आहे. तिच्या पतीचे नुकतेच निधन झाल्याने तिच्या घरच्यांकडून दुसरा जोडीदार शोधण्यासाठी सांगितले जात होते. त्याच दृष्टीने फिर्यादी ह्या विवाह संकेत स्थळावर जाऊन जोडीदाराचा शोध घेत होते. शादी डॉट कॉम या वेबसाइटवर त्यांची गॉडवीन नावाच्या व्यक्तीची ओळख झाली. त्याने आपण लंडन येथे राहत असल्याची बतवाणी केली. त्याने महिलेसोबत संभाषण वाढवले.

अशी केली फसवणूक

लग्नाची बोलणी सुरू होत असताना त्याने तिला 8 फेब्रुवारी रोजी फोन करून लंडन येथून दिल्ली एअरपोर्ट येथे आल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे डॉलर्स हे विदेशी चलन असून ते चलन भारतीय चलनात बदलून घेण्यासाठी खात्यावर 8 लाख 10 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. आरोपीने केलेल्या मागणीनुसार त्याने विश्वास ठेऊन फिर्यादीनेही त्यांना पैसे पाठवले. यानंतर फिर्यादीला आपली कोणीतरी फसवणूक करत असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी हे प्रकरण कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी पाठविले. प्राथमिक तपासात दोन नावे निष्पन्न झाली असून सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे यांनी हा गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...