आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांना मानसिक आधार देताना तिच्या कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचा विचार करून आधार दिला पाहिजे, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी केले.
समाजातिल महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आता समाजानेच पुढे आले पाहिजे. प्रसंगी शेजारच्या घरात होत असलेल्या काही प्रसंगात अत्याचारित महिलेला वाचवण्याची भूमिका देखील आपण घेतली पाहिजेत. संस्थात्मक रचनेत महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा संस्थांना समाजातील जबाबदार घटक म्हणून सहज भेट देण्यासाठी गेले पाहिजे. त्यांच्या कामावर समाजाचे लक्ष आहे अशा वातावरणात संस्था देखील जबाबदारीने काम करतात असा अनुभव आहे.
स्त्री आधार केंद्राच्या वतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि कोविड विधवांच्या प्रश्नावर पुण्यात आयोजित 'एकजुटीने लढू या ' कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त संगीता डावखर, लेखा अधिकारी मारुती मुळे, डेव्हलपमेंट सपोर्ट टीमच्या मिनी बेदी, मानसोपचार तज्ज्ञ मृदुला आपटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सर्वांनी एकमेकांना आधार देताना सहावेदना व्यक्त केली पाहिजे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.समाज कल्याण आयुक्तालयाच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी बोलताना समाज कल्याण विभागाच्या योजना, रमाई आवास योजना, याचसोबत महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, महिलांच्या कौशल्य विकासासाठी अर्थसहाय्य अशा योजनेसाठी गरजू महिलानी पुढे यावे, असे आवाहन केले.
समाज कल्याणचे वरिष्ठ अधिकारी मारुती मुळे यांनी यावेळी बोलताना माहिती दिली की, ऊसतोड कामगार महिलांच्या कुटुंबासाठी साखर शाळा, शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वसतिगृहे अशा योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून कित्येक कोटी रुपयांचा निधी वाटप झालेला आहे. साखर कारखाने आणि ऊसतोड कामगार विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी उभा राहणार आहे.
मानसोपचार तज्ज्ञ मृदुला आपटे यांनी महिलांच्या मानसिक विकासावर अधिक भर देत महिलांनी विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये मनोधैर्य कसे राखावे याबाबत मार्गदर्शन केले. डेव्हलपमेंट सपोर्ट टीमच्या मिनी बेदी यांनी स्वयंसेवी संस्थांची भूमिका मांडली.
केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी सचिव अपर्णा पाठक शेलार गुरुजी, विविध संस्थांच्या माध्यमातून समुपदेशन आणि इतर सेवा देणाऱ्या प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अशा प्रकारच्या कामाची आवश्यकता असल्याचे उपस्थित संस्था प्रतिनिधींनी मत व्यक्त केले. या प्रकारच्या संस्थांची माहिती एकत्रित करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. महिलांच्या प्रश्नावर येत्या हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार आहे असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.