आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीजचोरीविरोधात कारवाई:पश्चिम महाराष्ट्रात 4 कोटी 57 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महावितरणची राज्यभर धडक मोहीम

वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका देत महावितरणने वीजचोरीविरोधात वेगाने मोहीम सुरू केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड महिन्यात नियमित व विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ प्रमाणे फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह सर्व वर्गवारीमध्ये मागेल त्यांना व पाहिजे तेवढ्या वीजभाराची अधिकृत वीज जोडणी उपलब्ध असतानादेखील वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. आतापर्यंत १८७८ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. ५६६ प्रकरणांत ९९ लाख रुपयांची वसुलीदेखील करण्यात आली आहे. वीजचोरीविरोधातील मोहिमेला आणखी वेग देण्यासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे स्वतः या मोहिमेत विविध ठिकाणी भेटी देऊन महावितरणच्या पथकांना मार्गदर्शन करीत आहेत व वीजचोरीच्या विविध प्रकारांची पाहणी करीत आहेत.

पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने भोसरी, पिंपरी, कोथरूड, पर्वती, केडगाव, नगर रोड, पद्मावती, रास्ता पेठ या विभागांमध्ये वीजचोरीविरोधात धडक कारवाई करून वीजचोरीचे प्रकार उघड करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १०९६ ठिकाणी ३ कोटी ९९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. त्यापैकी १९४ प्रकरणांत ५९ लाख रुपयांचा दंड व वीज बिलांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत सुमारे २४० अभियंता व कर्मचाऱ्यांनी विविध पथकांद्वारे वाघोली परिसर, ताथवडे हायवे, पिंपळे निलख, हिंजवडी, भेकराईनगर, मांजरी, उद्री पिसोळी, वारजे, कात्रज आदी भागात वीजचोरीविरोधी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये १४२ ठिकाणी सुमारे ५३ लाख रुपयांची वीजचोरी आढळून आली.

वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई
उघडकीस आलेल्या सर्व वीजचोऱ्यांप्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ प्रमाणे कारवाई सुरू आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीज वापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. विद्युत अपघाताचा धोका असणाऱ्या विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीज जोडणी घेऊन मोठ्या रकमेची दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईमधील कारावासाची शिक्षा टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सोबतच या मोहिमेत विजेचा अनधिकृत वापरदेखील आढळून येत असून संबंधितांविरुद्ध कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीविरोधी वेगात असलेली ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...