आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेच्या कॅपिटॉल हिलवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्ती आपल्या देशात सत्तेत आहेत. त्या संसद व लोकशाही संस्था नष्ट करत चालल्या असून, गोमूत्र हे त्यांचे आवडते औषध आहे, अशा शब्दांत लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांनी शनिवारी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. ब्राह्मण्यवाद, भांडवलशाही, पितृसत्ताक व्यवस्था आणि इस्लामप्रति असलेल्या द्वेषभावनेविरोधात एल्गार करण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (आरएसएस) सत्यशोधक रेझिस्टन्स (एसएसआर) म्हणजेच द्वेषाच्या विरोधात प्रेमाची लढाई उभी करावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. कोरेगाव भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियानातर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या. परिषदेचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, निवृत्त पोलिस अधिकारी एस. एन. मुश्रीफ, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन आदी उपस्थित होते.
या वेळी परिषदेचे आयोजक किशोर कांबळे यांना एल्गार पुरस्काराने गौरविण्यात आले. पेशवाई गेली, तरी ब्राह्मण्यवाद संपलेला नाही. उलट त्याला कारखान्यात नेऊन आधुनिक मॅन्युअल व प्रोग्राम जोडला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या एकविसाव्या शतकातील ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात हे नेतृत्व सत्तेत बसले आहे, अशी खरमरीत टीका करुन रॉय यांनी वाढत्या आर्थिक विषमतेकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. कोरोनाच्या काळात पावणे दोन लाख जणांनी रोजगार गमावला असताना, अब्जाधीशांची संपत्ती मात्र ३५ टक्क्यांनी वाढली आहे. देशात काही कॉर्पोरेट कंपन्यांकडे सर्व साधन संपत्ती आहे. त्यावर मूठभर घराण्यांचा हक्क आहे. विरोधी पक्षांच्या घराणेशाहीवर हल्लाबोल करणारे पंतप्रधान मोदी या कॉर्पोरेट घराण्यांना मदत करतात, असा आरोप त्यांनी केला. नोटबंदी, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि आताचे कृषी कायदे हे मानवतेविरोधातील गुन्हे असून, आपण बेकायदा अध्यादेश काढणारे राष्ट्र झालो आहोत, अशी टीकाही त्यांनी केली.
हिंसेमागे भाजप, संघाचा हात
दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक होण्यामागे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा हात आहे. आंदाेलन बदनाम करून ते माेडून काढण्याचा माेदी सरकारचा डाव हाेता. परंतु हे आंदाेलन माेदींच्या गळ्याभाेवती आवळत चालले असून अंबानी-अदानींना पाठीशी घालण्याचे काम माेदी करत आहेत, असा आरोप बी. जी. कोळसे पाटील केला.
मनुवाद, मनीवादाविरोधात लढाई सुरू राहील
‘मनुवादी आणि मनीवादी एकत्र येऊन जात, पंथ, धर्माच्या नावाने आपले शोषण करत आहेत. त्यांचा सामना करत नवी व्यवस्था आणण्याचा संदेश देण्यासाठी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कितीतरी मोदी येतील आणि जातील, पण शेवटच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाविरोधातील लढाई सुरू राहील,’ असे कोळसे पाटील म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.