आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअन्न, वस्त्र, निवारा आणि कनेक्टिव्हीटी या आजच्या काळातील मूलभूत गरजा आहेत. डिजिटल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. याच गोष्टीचा लाभ घेण्यासाठी माध्यमे, राजकारण आणि उद्योग यांचे विलीनीकरण होताना दिसतेय. माध्यमांचा उपयोग करून आपले स्थान मजबूत करण्यावर राजकारण्यांकडून भर दिला जात आहे असे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या वतीने आर. के. लक्ष्मण म्युझियम, मुंबई प्रेस क्लब, द फॉरेन करस्पॉंडंट क्लब आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने विश्वराज बाग, लोणी काळभोर येथील विश्वशांती सभागृहात (घुमट) आयोजित तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी संपादिका स्मिता प्रकाश, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक राशीद किडवई, आर. के. लक्ष्मण म्युझियमच्या संचालिका उषा लक्ष्मण, एमआयटी वर्ल्ड पीसी युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्र-कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे संचालक धीरज सिंह, दूरदर्शनचे माजी महासंचालक मुकेश शर्मा, विद्यार्थी प्रतिनिधी इर्तिका एजाज, तेजस कोल्हटकर आदी उपस्थित होते.
जवाहर सरकार म्हणाले, कोविड काळात ओटीटी, मोबाईल जर्नालिझमने आपले स्थान प्रस्थापित केले आहे. त्यामुळे वृत्तपत्रे, वाहिन्या यांसह सोशल मीडिया, डिजिटल मीडिया या नवमाध्यमांचा प्रभाव मोठा आहे. निर्भया प्रकरण, अण्णा हजारे यांचे आंदोलन, नरेंद्र मोदी यांचे लॉन्चिंग यामध्ये या नवमाध्यमांचा फार प्रभावी उपयोग केला गेला. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप द्वारे परिवर्तनाच्या मोहीमा राबवल्या गेल्या. आज ही माध्यमे आपल्या प्रत्येकाच्या हाती आल्याने प्रत्येकाला आवाज उठवण्याची संधी मिळाली आहे.
स्मिता प्रकाश म्हणाल्या, माध्यमांचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने सामान्य नागरिकही आवाज उठवू शकतो. सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाच्या हाती नवी माध्यमे आल्याने स्वतःकडे लक्ष खेचून घेण्याची स्पर्धा लागली आहे. त्यातून गोंधळाचे वातावरण, चीड आणि नकारात्मता तयार होत आहे. मात्र, अशा गोंधळ घालणाऱ्यांपासून आपण सावध राहत नैतिकता आणि तत्वनिष्ठता जपायला हवी. भारतातील माध्यम उद्योग व्यापक आहे. येथे २३ पेक्षा अधिक भाषेत वृत्तपत्रे निघतात. ९०० पेक्षा अधिक सॅटेलाईट चॅनेल्स असून, हजारो डिजिटल चॅनेल्स व पोर्टल्स यामुळे वेगवेगळ्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.