आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी झाले शुद्ध:प्रदूषित रामनदीतून मंदिराच्या कुंडात येणाऱ्या पाण्याचे झाले तीर्थ; पीएच पातळीही सुधारली

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदूषित जलप्रवाहांच्या शुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी एकीकडे पाण्यात जात असताना, पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी एकत्रित येत सर्वाधिक प्रदूषित रामनदीतून सोमेश्वर मंदिरातील 900 वर्षे जुन्या कुंडात येणारे पाणी शुद्ध करून दाखवले आहे. हे पाणी शास्त्रीय निकषांवर पारखल्यानंतर ते पिण्यायोग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. यासाठी रीड बेड हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरण्यात आल्याची माहिती ‘किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पुनरुज्जीवन अभियाना’चे समन्वयक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

रीड बेड तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून येथील प्रदूषित पाण्याची ऑक्सीजन पातळी उंचावली असून पीएच पातळीही सुधारली आहे. म्हणजेच कुंडातील पाणी पिण्यायोग्य तसेच तीर्थ म्हणूनही वापरण्यायोग्य झाले आहे.

पुण्यातील पाषाण परिसरातील सोमेश्वर मंदिराला 900 वर्षांची परंपरा आहे. या मंदिर परिसरातील जिजाऊ कुंड परिसरात राम नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या वतीने 13 मार्च 2022 रोजी रीड बेडचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी अर्धवर्तुळाकार आराखडा तयार करण्यात आला. पर्यावरणपूरक बंधारे बांधून त्याच्या तळाशी कोळसा, विटा, बारीक वाळू, मती यांचा वापर करून स्थानिक प्रजातीच्या वनस्पती लावण्यासाठी जमीन तयार करण्यात आली. तेथे डकवीड, झेंडू, वाळा, नागरमोथा, कर्दळ, पाणकणीस, अळू, वॉटरलिली, कमळ अशी झाले लावण्यात आली.़

या प्रजातींच्या वनस्पतींची मुळे जलप्रवाहातील प्रदूषित घटक शोषून घेतात. त्यामुळे रामनदीतून कुंडात येणारे प्रदूषित पाणी रीड बेडमुळे स्वच्छ होत गेले. पर्यावरणपूरक बांध ओलांडून पुढे जाताना हे पाणी गाळले व पाझरले जाऊन त्यावर जैविक प्रक्रिया झाल्या. त्यातून पाण्यातील हायड्रोजनचा समतोल साधण्यास मदत झाली. अधिक शुद्ध पाणी शेवटच्या टप्प्यातील कमळतळ्यात पोचले, तेथेही ते गाळले जावे यासाठी जाळीचा दरवाजा बसवण्यात आला.

चित्राव म्हणाले की, अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी, कल्पक युवकांचा व शिक्षकांचा समावेश आहे. अतिशय कमी खर्चात पर्यावरपूरक उपक्रम यशस्वी करता येतात, हे आम्ही दाखवू शकलो.

रीड बेडचे काम डॉ. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. वनस्पतीशास्त्रतज्ञ डॉ. प्राची क्षीरसागर म्हणाल्या,‘आम्ही जाणीवपूर्वक स्थानिक प्रजातीच्या वनस्पती निवडल्या. या वनस्पती नैसर्गिकरीत्याच प्रदूषके शोषून घेतात. शिवाय नैसर्गिक बांध घातल्याने भौतिकरीत्याही पाणी गाळले गेले. त्याचा परिणाम म्हणून मोजक्या दिवसांत पाण्याचा दर्जा आश्चर्यकारकरीत्या सुधारला आहे. प्रकल्प सुरू करण्याआधी 1 एमजी पर लिटर असलेली ऑक्सीजन डिझॉल्व्ह लेव्हल आता 5.7 इतकी उंचावली आहे. तसेच पीएच पातळी 6.5 वरून 7.6 वर पोचली आहे.म्हणजेच पाणी पिण्यास योग्य झाले आहे.

सूक्ष्मजीवशास्त्रतज्ञ डॉ. अश्विनी कुलकर्णी म्हणाल्या,“कृत्रिम सांडपाणी प्रक्रिया प्रणाली म्हणजे रीड बेड होय. पर्यावरपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच सूक्ष्मजीवशास्त्राचा आधार घेत पाणी तसेच नदी प्रदूूषणमुक्त करणे शक्य आहे, हे या प्रयोगाने सिद्ध केले आहे.

—----

बातम्या आणखी आहेत...