आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला परिसरातील धायरीसह एकूण 29 ग्रामपंचायतींनी गुरवारी विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी धायरी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जामशिंग गिरासे, तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महिलांना समान दर्जा देण्यासाठी व समाजातील कुप्रथा बंद करण्याचे काम सुरू आहे. खडकवासला मतदार संघातून शंभर टक्के विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव होणे मार्गदर्शक आहे. राज्यातील गावागावात असे ठराव होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजात महिलांना समान दर्जा देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, खडकवासला विभागातील अनेक ग्रामपंचायतीनी विधवा प्रथे विरुद्ध ठराव केला. २९ ग्रामपंचायतींचा कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. एकाच वेळी ठराव करणारा राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. विधवा महिलांना समान अधिकार आहेत. गावातील सरपंच, महिला यांनी यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय बाब आहे. राज्यातील गावागावात असे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
29 ग्रामपंचायतींचा ठराव
राज्य महिला आयोगाने विधवा प्रथासारख्या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला राज्यभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल 29 ग्रामपंचायतींनी व काही प्रभागातील नागरिकांनी आज हा ठराव मंजूर केला आहे. खडकवासला हा महाराष्ट्रातील 100 टक्के विधवा प्रथा बंदी करणारा पहिला मतदारसंघ असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.